शून्यातून सुरू केलेली शिवजयंती झाली आभाळाएवढी

शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळाने काढली भव्य शोभायात्रा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: जेमतेम २०-२५ वर्षांचे युवक एकत्र येतात. छत्रपती शिवरायांवरील त्यांची दृढनिष्ठा ओसंडून वाहते. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपतींचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा ते संकल्प करतात. त्यासाठी शिवजयंती सार्वजनिक स्तरावर साजरी करण्याचं ते ठरवतात. कॉलेज लाईफ सुरू असलेलं किंवा संपलेलं हे तारुण्य.

हाताशी पक्का रोजगार नाही. शिवजयंती साजरी करण्यासाठी पैसा कुठून आणायचा? हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. ८ वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांनी काहींची आर्थिक मदत घेतली. आणि शिवजयंती सुरू झाली. पहिल्या वर्षी फक्त रक्तदान शिबिर झालं. छत्रपतींची शहरातून पालखी काढली. पहिली शिवजयंती छोटी झाली. मात्र छत्रपतींवर असलेलं या युवकांचं श्रद्धा निष्ठा आणि प्रेम हे आजही आभाळाएवढं आहे. यावर्षी शिवजयंतीचे आठवं वर्ष.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यंदा शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळाने मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी केली. पूर्वी दिवंगत मुख्याध्यापक नरेंद्र इंगोले गुरुजी यांच्या पुढाकारातून शिवजयंती साजरी व्हायची. हाच आदर्श कदाचित या युवकांनी ठेवला असावा. या युवकांनी शिवजयंतीला आकर्षक अशी शोभायात्रा काढली. ती शिवतीर्थ-जटाशंकर चौक-गांधी चौक-गाडगेबाबा चौक-भगतसिंग चौक-सुभाषचंद्र बोस चौक-टागोर चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे निघाली.

त्याचा शिवतीर्थावर समारोप झाला. यात अयोध्येच्या राम मंदिर देखावा होता. अश्वाचे शौकिन असलेले आणि नियमित अश्वस्वारी करणारे डॉ. संकेत अलोणे छत्रपतींच्या भूमिकेत होते. चिमुकल्या लोभस मुलींनी राजमाता जिजाऊ साहेब आणि महाराणी सईबाई साहेब साकारल्यात. वणीतील छत्रपती ढोल ताशा पथक, महाराजांच्या वेशभूषेतील कलावंत, पॉवर प्लस साउंड, ब्लास्टर साउंड, ब्रदर लाईट्स अशी अनेक आकर्षणे शोभायात्रेची होती.

अध्यक्ष-उपाध्यक्ष नाही, तर छत्रपतीच सर्वोच्च – दीपक पाऊणकर
आमच्या समितीत अध्यक्ष-उपाध्यक्ष वगैरे प्रकारच नाही. इथं छत्रपतीच सर्वोच्च आहेत. आम्ही सर्व छत्रपतींचे सेवक आहोत. केवळ परवानगी आणि इतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आमची कार्यकारिणी आहे. आम्हा सर्वांसाठी छत्रपतीच मोठे आहेत. छत्रपतींचा जन्मोत्सव निर्दोष आणि मोठा करावा असा आमचा सर्वांचा प्रयत्न असतो. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणूनच हे विधान करतोय.

या शिवजयंती महोत्सवात दीपक पाऊणकर,गौरव देशमुख, सौरभ बोडे, अथर्व भोयर, मंगेश काकडे, संकेत ठाकरे, शिवाजी डोनेवार, विपिन ठावरी, संजोग खामनकर, गणेश गोहोकार, साहिल सुरपाम, कुणाल सुरपाम, सुशांत अंबागडे, समीर किटकुले, हर्षद जुनेजा, हर्षल खामनकर, पवन गाऊत्रे, शुभम वानखेडे, निखिल खाडे, सागर समर्थ, योगेश मजगवळी, पवन ठावरी, पवन नागरकर या सर्वांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्यात.

Comments are closed.