वणीतले ‘देवेंद्र’ म्हणालेत, ‘मी पुन्हा देईन’, ‘मी पुन्हा देईन’

दोन ग्रंथपालांनी प्रसिद्ध ग्रंथोत्सव गाजवत दिला विश्वास

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ म्हटलं की, ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा सर्वांनाच आठवते. वणीतल्याही ‘दवेंद्र’ यांनी ‘मी पुन्हा देईन’ हा विश्वास वणीकरांना दिला. हे देणं वाचकांना सेवेचं आणि गुणवत्तेचं असणार आहे. वाचनालयाला समृद्धीचं आहे. निमित्त होतं, यवतमाळ ग्रंथोत्सवाचं. यात “तालुका उत्कृष्ट ग्रंथपाल” देवेंद्र भाजीपाले तर “वणी तालुका उत्कृष्ट ग्रंथपाल” शुभम कडू यांना गौरविण्यात आले.

यवतमाळ ग्रंथोत्सव २०२४ अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम झालेत. यवतमाळ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने दिनांक २०, २१ फेब्रुवारीला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेत हा महोत्सव आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री मा. संजय राठोड यांनी केले. ग्रंथालयांच्या संदर्भातील सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन त्यांनी ग्रंथालय कर्मचारी यांना दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी जिल्हातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभले पाहिजे. गुणात्मक विकास झाला पाहिजे. ग्रंथालयांकडून जिल्हातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देता याव्यात. त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्याकडून “उत्कृष्ट वाचक / ग्रंथपाल / कार्यकर्ते / सेवक” यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात येते.

यवतमाळ जिल्हातील उत्कृष्ट ग्रंथालयांमधून नगर वाचनालय, वणी यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हातील “तालुका उत्कृष्ट ग्रंथपाल” म्हणून नगर वाचनालय वणी येथील ग्रंथपाल देवेंद्र भाजीपाले तर वणी तालुक्यातील “वणी तालुका उत्कृष्ट ग्रंथपाल” म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय येथील ग्रंथपाल शुभम कडू यांचा सत्कार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांच्या हस्ते सत्कार झाला. या सत्काराबद्दल संपूर्ण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रंथालयांना समृद्ध करणे माझी जबाबदारी 

मी तालुका “अ” वर्ग ग्रंथालयाचा ग्रंथपाल आहे. वणीतील हे प्रसिद्ध नगर वाचनालय सन 1874 ला सुरू झाले. त्यामुळे याचा दर्जा, गुणवत्ता व सेवा अधिकाधिक समृद्ध करण्याची माझी जबाबदारी खूप मोठी आहे. माझ्या तालुक्यातील ग्रंथालयांतील ग्रंथालयांना समृद्ध करणे व मार्गदर्शन करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मी नियमितच त्यांच्याशी संपर्क करून त्यांना मार्गदर्शन करीत असतो.

देवेंद्र भाजीपाले
ग्रंथपाल, नगर वाचनालय, वणी

 

अधिकाधिक वाचक जोडण्याचा प्रयत्न करेन
“माझ्या या ग्रंथालयीन सेवेत मला एकही दिवस कामाचा कंटाळा आला नाही. इतकं या सार्वजनिक ग्रंथालयातलं काम वेगवेगळ्या प्रकारचं आहे.” ‘सेवेचे ठायी सदा तत्पर’ हे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याला मी नेहमी कायम जागणार आहे. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाने ग्रंथपाल म्हणून काम करण्याची संधी दिली. यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचले आहे. तेवढ्याच निष्ठेने मी अधिकाधिक वाचक जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.मी वाचनालयाचा कायम ऋणी आहे.

शुभम कडू
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय, वणी

Comments are closed.