काळतोंड्याचा घरात पिंगाच; पण दाखवला नाही इंगा

तरोडा (सुंदरनगर) येथे आढळला दुर्मीळ प्रजातीचा साप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. मात्र सर्वच साप हे विषारी नसातात, हे अनेकांना ठाऊक नाही. अनेक दुर्मीळ प्रजातींचे साप हे मानवी हस्तक्षेपांमुळे दिवसेंदिवस नष्ट होत चाललेत. असाच एक दुर्मीळ प्रजातीचा साप सुंदरनगर येथील तरोडा या गावात आढळला.

साप दिसला रे दिसला की, सर्वजण त्याला मारण्याचा आटापिटा करतात. मात्र काही सुज्ञ नागरिक सर्पमित्रांची मदत घेतात. अशाच काही दक्ष नागरिकांनी तरोडा येथे साप निघाल्यावर हेल्पिंग हॅण्डस् या संस्थेला कॉल केला.एमएच 29 हेल्पिंग हँडस् चे सर्पमित्र राजू भोगेकार यांनी याची त्वरीत दखल घेतली. त्यांनी लगेच तरोडा, सुंदरनगर गाठलं. तेथील गणेश सिडाम यांच्या घरी तो साप निघाला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सर्पमित्र राजू भोगेकार यांनी सर्वात आधी नागरिकांना धीर दिला. मग सापाचं निरीक्षण केलं. तो कृष्णशीर्ष (काळतोंड्या) साप असल्याचे दिसले. त्याला दुखापत न करता पकडलं. त्या सापाची तेथील जनतेला माहिती दिली.  या सापाचे तोंड काळे असल्यामुळे याला काळतोंड्या असे म्हणतात. याला कृष्णशीर्ष असेही म्हटले जाते.

हा साप जमिनीपासून आपली मान उंचावतो. त्यामुळे तो नागाचे पिल्लू असल्याचा भास होतो. त्यात त्याचा जीव जातो. हा साप हुबेहूब पोवळा या विषारी सापासारखा दिसतो. काळतोंड्या व पोवळा या दोन्ही सापांतील अंतर सूक्ष्म निरीक्षण केल्यावरच लक्षात येते. या सपाची लांबी सरासरी 1 फूट ते अधिकतम 1.5 फूट असते .

या सापाची वणी येथील वनविभागामध्ये नोंद करुन वनपरीक्षेत्र अधिकारी यांना दाखवले. त्यांच्या मार्गदर्शनात त्याला नैसर्गिक आवासात सोडले. यावेळी उपस्थित एमएच २९ हेल्पींग हंड्सचे वन्यजीव रक्षक रमेश भादीकर व राजू भोगेकर, अनिकेत कुमरे , संतोष गुम्मुलवार ,नितीन माणुसमारे, समीर गुरनुले, दिवेंद्र भोगेकर, अमोल, रोहित, दीपक, कुणाल, आशीष, दिनेश हे उपस्थित होते. एमएच २९ हेल्पींग हंड्सच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments are closed.