बहुगुणी डेस्क, वणी: अनेकविध धर्म आणि संस्कृतींनी हा देश नटलेला आहे. त्यातील वैविध्यातली समानता भारतीयांनी जपली. मात्र अधूनमधून काही समाजकंटक हे सौहार्दाचं वातावरण बिघडवण्याचं काम करतात. तेव्हा देशाची, समाजाची समरसता जपणं, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन आवारी ट्युटोरिअल्सचे संचालक प्रा. घनश्याम आवारी यांनी केले.
नवशक्ती दुर्गा माता मंदिर आणि अनुलोम अनुगामी लोकराज्य महाभियान संस्थेने आयोजित केलेल्या महाकुंभ संगम तीर्थजल पूजन कार्यक्रमात बोलत होते. प्रा. आवारी यांनी पुढे बोलताना अनेक विषयांना हात घातला. ते म्हणाले की, आपला देश हा उत्सवप्रिय आहे. वर्षभर विविध जाती-धर्मांचे सण-उत्सव आणि सोहळे सुरूच असतात. त्यात आपण सहभागी व्हावे.
तो उत्सव किंवा सण आपल्या जाती किंवा धर्माचा आहे काय, हा विचार बाजूला ठेवला पाहिजे. अशा सण आणि उत्सवांमुळे माणूस जोडला जातो. पर्यायाने आपला देश सामाजिकदृष्ट्याही अधिक बळकट होतो.
नित्य आरतीनंतर प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या महाकुंभातील संगमाचे तीर्थजल पूजन झाले. प्रयागराज कुंभ येथून आणलेल्या गंगा जलाचे विविध जातिधर्माच्या जोडप्यांद्वारे पूजन झाले.
हा सोहळा शहरातील डॉ. आंबेडकर चौकातील नवशक्ती दुर्गा माता मंदिरात झाला. या कार्यक्रमाचे आयोजन नवशक्ती दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर, दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुर्ले, नितीन बिहारी, सर्व सदस्य मंडळ तथा अनुलोम संस्थेने केले.
Comments are closed.