गुप्तधनाच्या बहाण्याने अडीच लाखांनी गंडवले

ट्रॅप लावून दोन भामट्यांच्या वणी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: गुप्तधन काढून देण्याच्या नावाखाली एका कुटुंबाची सुमारे अडीच लाखांनी गंडा घातला. भामट्यांनी एक तोळे सोनं व 1 लाख 65 हजार रोख रक्कम गुप्तधानाच्या बहाण्याने उकळली. तसेच आणखी गुप्तधन काढण्याच्या नावाखाली 12 लाखांची मागणी केली. मात्र फसगत झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी दोन्ही भामट्यांना वणी येथे बोलावले. त्यानुसार आयटीआयजवळ पोलिसांनी सापळा रचून या दोन भामट्यांच्या मुसक्या आवळल्या. यासह त्यांच्यासह असलेल्या वाहन चालकालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दीड लाख नगदी, एक तोळे सोन्याचा नेकलेस व एक कार असा सुमारे साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदर प्रकरणाला दोन महिन्यापासून सुरुवात झाली. फिर्यादी रमेश (काल्पनिक नाव वय 44) हा कोरपना तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. त्यांची दोन महिन्यापूर्वी आरोपी किष्णा कन्हैया येधानी (27) रा. कवठा, पोस्ट आष्टा, ता. जि. नागपूर याच्याशी संपर्क झाला. त्याने रमेशला तुमच्या घरात गुप्तधन असल्याचे सांगितले. ही सोन्याची हंडी जर तुम्ही काढली नाही तर तुमच्या घरातील एखादी व्यक्तीचे कमी जास्त होईल, अशी भीती आरोपीने दाखवली. आरोपीने उपाय म्हणून विधी सूचवत त्यासाठी खर्च होईल असेही सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रमेशने घरात असलेले गुप्तधन काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी 5 मार्च ही तारीख ठरली. ठरलेल्या दिवशी आरोपी किष्णा कन्हैया येधानी व त्यांचा साथीदार जितेंद्र जीवन राठोड (29) रा. आसोला सावंगी, ता. जि. नागपूर हे दोघे सोन्याचा हंडा काढण्यासाठी रमेशच्या घरी आले. त्यांनी पुजेच्या सामुग्रीसाठी नगदी 1 लाख 65 हजार रूपये घेतेल. दुपारी दीड वाजताच्या सुमारास पूजेला सुरुवात झाली. विधीनंतर त्यांनी हंडा मिळाल्याचे सांगत एका लाल कपड्यामध्ये हंडा टाकून रमेशला दिला. तसेच या हंड्याला उघडू नका, नाही तर काही तरी अर्नथ होईल, असे सांगत हंडा घराच्या अड्याला बांधायला सांगितला. घरात आणखी दोन हंडे काढायचे आहेत, हे दोन हंडे काढताना त्याला सोने चढवावे लागते अशी बतावणी त्यांनी केली. तसेच आरोपीने फिर्यादी जवळून अकरा ग्रॅम सोन्याचा नेकलेस घेतला. त्यांनी हा नेकलेस मातीच्या गाडग्यात टाकून घराच्या मागे मातीत गाडल्याचे दाखवले.

भामट्यांची 12 लाखांची मागणी
दिनांक 9 मार्च रोजी सकाळी या भामट्यांनी रमेशला कॉल केला. त्यांनी दोन हंडे काढण्याकरीता एक विधी सांगितला. तसेच त्यासाठी 12 लाखांचा खर्च सांगितला. त्यावर रमेशने एवढा खर्च करण्यास असमर्थता दर्शवली. विधी न केल्यास तुमच्या मुलाला व तुमच्या घरच्यांना जिवीतहानी होवू शकते अशी धमकी त्यांनी दिली. घाबरलेल्या रमेशने याची माहिती त्याच्या साळ्याला दिली. साळ्याने व रमेशने घराच्या आड्याला बांधून असलेला लाल कपड्यामधला हंडा उघडून पाहीला असता त्यामध्ये एका तांब्याच्या हंड्यात पितळी धातूच्या मूर्त्या आढळल्या. तसेच त्यांनी मातीत गाडलेला नेकलेस पाहिले असता त्यांना तिथे नेकलेस आढळला नाही. साळ्याने जावयाला फसगत झाल्याचे सांगितले.

टप्प्यात घेऊन गेम
फसवणूक झाल्याची लक्षात आल्यावर रमेशने दोन्ही भामट्यांना घरी बोलावले. मात्र दोन्ही आरोपी रमेशच्या गावी येण्यास टाळाटाळ करीत होते. गोडीगुलाबीने बोलून रमेशने दोन्ही भामट्यांना विधीचा खर्च देतो असे सांगितले. अखेर दोन्ही आरोपीने रमेशच्या गावाऐवजी वणी किंवा वरोरा येथे भेटण्याचे मान्य केले. रविवारी दिनांक 16 मार्च रोजी वणीतील लालगुड्याजवळील आयटीआय कॉलेज जवळ भेटण्याची वेळ ठरली. वणीत दोन्ही भामटे येणार असल्याची माहिती मिळताच फिर्यादी रमेशने फिल्डिंग लावली. याची माहिती वणी पोलीस ठाण्याला दिली. 

सापळा रचून आवळल्या मुसक्या
रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास दोन्ही आरोपी हे इनोव्हा कारने (MH 44 B 0055) आयटीआयजवळ पोहोचले. रमेशने दोन्ही भामट्यांना तुम्ही नेकलेस व पैसे लंपास केल्याचे सांगितले. गुप्तधनाच्या नावाखाली तुम्ही फसगत केल्याचे सांगत पैसे व नेकलेस परत मागितला. त्यावर भामट्यांनी काहीही परत देणार नाही. जे करायचे आहे ते करा अशी धमकी दिली. त्यानंतर रमेश, त्यांचा साळा व इतर साथीदारांनी दोन्ही भामट्यास व वाहन चालक सुशील राजेश द्विवेदी (36) रा. तारशी पोस्ट बोरखेडी तालुका जि. नागपूर  पकडले. याची माहिती वणी पोलीस ठाण्याला दिली. पोलीस आयटीआयजवळ पोहोचले व त्यांनी दोन्ही भामट्यास व वाहन चालकास ताब्यात घेतले. त्यांच्यावर बीएनएसच्या कलम 318 (4), 352, 351 (2), 351(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींकडून दीड लाख रुपये नगदी, 11 ग्रॅम सोन्याचा नेकलेस किंमत 90 हजार व एक टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी किंमत 7 लाख असा सुमारे 9 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी दोन्ही भामटे व वाहन चालक यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सदर कारवाई एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि धीरज गुल्हाने (डि बी पथक प्रमुख ), पोका वसीम, पोका गजानन, पोका निरंजन, पोका  मोनेश्वर यांनी केली.

Comments are closed.