घरासमोर बैलबंडी लावण्यावरून वाद, तिघांना मारहाण

उमेदपार्क येथील घटना, तिघांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: घरासमोर बैलबंडी लावण्यावरून झालेल्या वादात एका कुटुंबातील तीन सदस्यांना मारहाण करण्यात आली. शनिवारी दिनांक 15 मार्च रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास गणेशपूर येथील उमेदपार्क येथे ही घटना घडली. या मारहाणीत एक जण जखमी तर दोघे जण किरकोळ जखमी झालेत. या प्रकरणी मारहाण करणा-या तिघांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारीनुसार, अरुण शामराव खोकले (67) हे उमेदपार्क गणेशपूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घराशेजारी आरोपी अविनाश नरेंद्र दोडके (34) राहतो. सध्या खोकले यांच्या शेतातील चणा काढण्याचे काम सुरु आहे. शनिवारी दिनांक 15 मार्च रोजी मजुरांनी शेतातील चणा काढला. काढलेला चणा शेतातील सालगड्याने बैलबंडीत भरला. रात्री 8 वाजताच्या सुमारास सालगड्याने बैलबंडी उमेदपार्क येथील खोकले यांच्या घरासमोर लावली. सालगडी बंडीतील चणा उतरवत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान अविनाश दोडके हा कारने घरी जात होता. त्याने अरुण यांना रस्त्यावर बैलबंडी का लावली, त्यामुळे मला कार नेण्यास अडचण जात आहे, असे म्हणत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळाने अविनाशचा मुलगा त्याच्या एका मित्राला घेऊन आला. अविनाश याने अरुण यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने हातातील कड्याने अरुण यांच्या कपाळावर वार केला. त्यामुळे अरुण यांच्या कपाळातून रक्त आले. तर अविनाशच्या मुलाने व त्याच्या मित्राने अरुण यांना बुक्यांनी मारहाण करून खाली पाडले.

हा वाद सुरु असताना खोकले यांचे दोन्ही मुलं वाद सोडवण्यास मध्ये पडले. त्यांना देखील शिविगाळ करून मारहाण करण्यात आली. या झटापटीत अरुण यांच्या गळ्यातील सोन्याचा गोप गहाळ झाला. अरुण खोकले यांच्या पत्नी आशा खोकले यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अविनाश नरेंद्र दोडके, त्याचा मुलगा व त्याच्या मित्रावर बीएनएसच्या कलम 115(2), 118(1) 3(5) 351(2) 351(3) 352 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.