रंगणार कबड्डीची दंगल, होईल कुणाचं मंगल, अनेक बक्षिसांची लयलूट

दिवंगत खा. बाळू धानोरकर स्मृतिप्रीत्यर्थ 4, 5 व 6 एप्रिलला खासदार चषक कबड्डी स्पर्धा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहराला कबड्डीची मोठी आणि प्रदीर्घ काळाची परंपरा आहे. इथल्या मल्लांनी मोठमोठ्या पातळींवर मैदान गाजवले आहे. असाच कबड्डीचा थरार वणीकरांना येत्या 4, 5 व 6 एप्रिलला शासकीय मैदानावर अनुभवता येणार आहे. दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सौजन्याने तीन दिवसीय खासदार चषक कबड्डी स्पर्धा होत आहे.

बाळू धानोरकर हे स्वत: क्रीडा प्रेमी होते. ते सर्वच क्रीडाप्रकारांना आणि स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचे. त्यांना हक्काचं मैदान मिळावं, त्यांना आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवता यावी यासाठी ते नेहमी प्रयत्नरत असायचे. याकरिता त्यांनी अनेक ठिकाणी यशस्वी क्रीडा स्पर्धा घेतल्यात. त्यांच्या निधनानंतर ह्या क्रीडा स्पर्धा अविरत सुरू राहाव्यात, याकरिता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढाकार घेतला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

म्हणूनच वणी येथील शासकीय मैदानावर दिनांक 4, 5 व 6 एप्रिलला खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गादीवर होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, नागपूर, बारामती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, येथील नामवंत संघ सहभागी होतील. प्रथम विजयी संघाला 1 लाख रूपये, द्वितीय विजयी संघाला 71 हजार रूपये, तृतीय विजयी संघाला 51 हजार रूपये, तर चतुर्थ विजयी संघाला 31 हजार रूपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

सोबतच वैयक्तिक बक्षिसांचीदेखील यात लयलूट होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी युवा नवरंग क्रीडा मंडळाचे सचिन टेकाम, आशीष धोंगडे, संदीप फटाले, विशाल नैताम यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.

Comments are closed.