बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील शिवाजी पार्कजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. शुक्रवारी दिनांक 11 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चोरटे हे पंचविशीतील असल्याची माहिती आहे.
तक्रारीनुसार, चिखलगाव येथील महादेव नगरीत राहणारे विकास पुरुषोत्तम ढेंगळे (वय 42) हे नटराज मार्केटिंग येथे बिल्डर सुपरवायझर म्हणून काम करतात. ते आपली कामे आटोपून मोटारसायकलने शिवाजी पार्कजवळून जात होते. दरम्यान त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. त्यामुळे त्यांनी मोटारसायकलचा वेग कमी केला.
ते मोबाईलवर बोलत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीवरील 3 चोरट्यांपैकी मध्ये बसलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या कानाला लागलेला मोबाईल हिसकावला आणि सुसाट पळ काढला. विकास ढेंगळे यांनी आरडाओरड करत चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही.
सदर मोबाईल हा विवो कंपनीचा होता व त्याची किंमत 18 हजार रुपये होती. याबाबत त्यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार, चोरटे 20 ते 25 वयोगटातील असावेत. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएस कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांमध्ये चिंता
वणी शहरात अशा प्रकारच्या सिनेस्टाइल चोऱ्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये किंमती वस्तूंच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वीही दुचाकीस्वार चोरट्यांनी नागरिकांना फसवून रोख रकमेची चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरटे विविध युक्त्या वापरून चोरी करत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे.



Comments are closed.