शोकाकुल वातावरणात कोरपेनवार सर यांना अखेरचा निरोप

अंत्ययात्रेत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंची उपस्थिती

बहुगुणी डेस्क, वणी: सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक दिलीप कोरपेनवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी वणीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वणीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिकांनी अंत्ययात्रेत सहभाग घेतला होता. अंत्यसंस्कारानंतर झालेल्या शोकसभेत उपस्थितांनी सहवेदना व्यक्त केल्यात.

रविवारी दुपारी दिलीप कोरपेनवार यांचे पार्थिव वरोरा येथून वणी येथे त्यांच्या रविनगर येथील राहत्या घरी आणण्यात आले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी  ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी 9.30 वाजता रविनगर येथील राहत्या घरून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. अंत्यसंस्कारानंतर झालेल्या शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी सहवेदना व्यक्त केल्यात. या सभेचे अध्यक्ष आमदार संजय देरकर होते.

मनोगत व्यक्त करताना देरकर म्हणाले की कोरपेनवार सर यांच्या अकस्मात जाण्याने वणीतील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण कोरपेनवार सर होते. त्यांच्यापासून अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. तर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की त्यांनी नगर सेवा समितीच्या माध्यमातून केलेले पर्यावरण व नगर स्वच्छतेचे काम हे कधीही न विसरण्यासारखे आहे. वणी हिरवीगार करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.त्यांनी लावलेली झाडे त्यांच्या स्मृती जपतील. अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह अधिकारी वर्ग, नगर पालिकेची कर्मचारी, नगरपालिकेच्या शाळेचे शिक्षक तसेच हजारो वणीकर सहभागी झाले होते.  

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणीतील नगरपालिका शाळा क्रमांक 8 चे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले दिलीप नारायणराव कोरपेनवार (57) यांचा वरोरा-चिमूर येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. हा अपघात 21 जुलै 2025 रोजी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास घडला. कोरपेनवार हे कामानिमित्त मालवाहू पिकअप वाहनाने चिमूरकडे जात होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरने (क्रमांक MH34-BJ6445) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

ही धडक पॅसेंजर साइडला बसल्याने कोरपेनवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातावेळी पिकअपमध्ये चालक आणि क्लीनरसह तिघे प्रवासी होते. चालक आणि क्लीनर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरपेनवार यांच्या अकाली निधनामुळे वणी आणि परिसरात शोककळा पसरली आहे. 

Comments are closed.