साईलीला नगरी नवविवाहिता आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल

धक्कादायक - पती दारुच्या नशेत पत्नीचे हात पाय बांधून करायचा....

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील मुकुटबन रोडवरील साईलीला नगरी येथील नवविवाहिता आत्महत्या प्रकरणी सासरच्या मंडळींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणी तालुक्यातील कुंभारखनी येथील 28 वर्षीय आरती जयबुद्ध बुरचुंडे यांनी बहिणीच्या घरी आत्महत्या केली होती. शनिवारी 19 जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. सहा महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. वैवाहिक जीवनातील मतभेदांमुळे ती माहेरी आली होती. दरम्यान एमपीएससीची तयारी करण्यासाठी ती साईलीला नगरी येथे राहत असलेल्या तिच्या बहिणीकडे शिफ्ट झाली होती. सासरच्या मंडळींनी मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आरतीच्या वडिलांनी केला होता. अखेर या प्रकरणी आरतीचा पती, सासू व ननंद या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

तक्रारीनुसार,किशोर भाऊराव करमरकर (57) हे मुळचे घुग्घुस येथील रहिवासी असून ते सध्या कुंभारखणी येथे राहतात. ते वेकोलि कुंभारखाणी येथे काम करतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मृत आरती ही त्यांची धाकटी मुलगी होती. आरती यांचा 19 जानेवारी 2025 रोजी मातोश्री नगर, आनंदवन वरोरा येथे राहणा-या जयबुद्ध बुरचुंडे याच्याशी रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. जय हा वेकोलिच्या कोलारपिंपरी कोळसाखाणीत कार्यरत असल्याची माहिती आहे. आरतीच्या वडिलांनी लग्नात दागदागिने केले, भेटवस्तू दिल्यात तसेच वरातीचा येण्या जाण्याचा खर्च केला.

नवविवाहित दाम्पत्य हनिमूनसाठी गोवा येथे गेले. मात्र हनिमूनहून परत आल्या आल्याच आरतीला हुंड्यासाठी त्रास देणे सुरु झाले. लग्नाच्या अवघ्या दहा दिवसातच आरतीने वडिलांना कॉल करीत सासरचे मंडळी दहा लाख रुपये आणण्याची मागणी करीत आहे. तसेच पैशासाठी मारहाण व मानसिक देत असल्याची माहिती तिने दिली. दोन दिवसांनी आरतीचे वडील तिच्या वरोरा येथील घरी गेले. त्यांनी 50 हजार रुपये दिले. तसेच त्यांनी मुलीला मारहाण करू नका, अशी विनवणी सासरच्या मंडळींना केली. मात्र त्यानंतरही आरतीला मारहाण सुरुच होती. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पती दारुच्या नशेत पत्नीचे हात पाय बांधून…
दिनांक 23 एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आरतीचा तिच्या वडिलांना कॉल आला. तिने तिच्या वडिलांना सासरची मंडळी 10 लाखांसाठी सतत शिविगाळ करीत मारहाण करतात असे सांगितले. त्यामुळे आरतीच्या वडिलांनी त्वरित वरोरा गाठून तिला माहेरी परत आणले. घरी माहेरी आरतीने पतीच्या अत्याचाराचा पाढाच वाचला. पती दारुच्या नशेत हातपाय बांधून अनैसर्गिक अत्याचार करायचा, अशी धक्कादायक माहिती तिने वडिलांना दिली. यासह हनिमूनला केवळ दोघांनी जाण्याऐवजी पती गोव्याला दोन मित्रांना सोबत घेऊन आला होता. तिथे तो मित्रांसोबत सतत दारू पित राहायचा. असेही सांगितले.

माहेरी आल्यानंतर आरतीने स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला. तिने वणीतील एका खासगी क्लासमध्ये प्रवेश देखील घेतला. तेव्हापासून ती तिच्या साईलीला नगरी येथील बहिणीकडे राहत होती. पतीचा त्रास होऊ नये म्हणून तिने मोबाईल नंबर देखील चेंज केला होता. आत्महत्येच्या दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी दिनांक 17 जुलैला रात्री आरतीच्या पतीने सास-यांना कॉल करून पैशाची व्यवस्था करा अन्यथा तिला घरीचा ठेवा, अशी धमकी दिली. आरतीच्या वडिलांनी ही माहिती आरतीला दिली. त्यामुळे आरतीने पतीला कॉल करून आताच लग्नात खर्च झाल्याने बाबांकडे पैसे नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे मागू नको, असे सांगितले. मात्र पतीने तू मर किंवा काहीही कर पण 10 लाख आण, असे म्हटले. याचा आरतीच्या मनावर मोठा परिणाम झाला. 

अखेर संपवली जीवयात्रा….
दुस-या दिवशी 18 जुलैच्या रात्री साईलीला नगरीमध्ये बहिणीच्या घरी सर्व कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. घरातील सर्व मंडळी झोपण्यासाठी गेले. मात्र, 19 जुलैला सकाळी उशीर झाला तरी आरती उठली नाही. बहिणीने त्यांच्या खोलीत पाहिले असता ती तिथे नव्हती. बराच वेळ ती न दिसल्यामुळे तिची बहिण वरच्या माळ्यावरील बेडरूममध्ये गेली. तिथे आरती पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

मृत्यूनंतरचे सर्व विधी पार पडल्यानंतर आरतीचे वडील किशोर करमरकर यांनी वणी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरतीचा पती जयबुद्ध संकल्प बुरचंडी, सासू प्रतिमा संकल्प बुरचंडे, ननंद कुं. प्रतीक्षा संकल्प बुरचंडे यांच्या विरोधात हुंडाबंदी कायद्याच्या कलम 1 व बीएनसच्या कलम 352, 115 (2), 80(2), 108, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

Comments are closed.