विद्यार्थ्यांच्या मदतीला मनसे; विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा

ग्रामीण विद्यार्थ्यांना दिलासा; पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बस सेवेचा शुभारंभ

विवेक तोटेवार, वणी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नसल्याने शिक्षणात अडथळे निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेत ‘चनोडा ते मारेगाव’ या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘अमित साहेब ठाकरे दत्तक योजना’ अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, विद्यार्थी व पालकांकडून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.

एसटी महामंडळाच्या अनियमित बससेवेचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सातत्याने बसत असल्याची तक्रार होती. अनेक वेळा बस वेळेवर न येणे, बसमध्ये प्रचंड गर्दी असणे किंवा मानव विकास मिशन अंतर्गत धावणाऱ्या बसेस विद्यार्थ्यांच्या थांब्यावर न थांबणे, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी मनसेने मोफत बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या बस सेवेच्या उद्घाटनप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मारेगाव तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर, रोशन शिंदे, निखिल मेहता, आकाश खामणकर, ॲड. योगेंद्र तुराणकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे चनोडा ते मारेगाव मार्गावरील विद्यार्थ्यांच्या नियमित प्रवासाचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असून, पालकांनीही या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियमित बससेवा उपलब्ध करून देणे हे एसटी महामंडळाचे मूलभूत कर्तव्य असताना, ती जबाबदारी पार पाडण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याची टीका मनसेकडून करण्यात आली. “एक हात विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता परिवहन विभाग याबाबत ठोस उपाययोजना करणार का, याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.