पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी तालुक्यातील कायर गावात वैद्यकीय पात्रता आणि वैध नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टर अरविंद गणपतराव राऊत (वय 60) याच्याविरुद्ध शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर थेरे यांच्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट 1961 च्या कलम 33 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
कायर येथे अरविंद राऊत हा कोणतीही वैद्यकीय मान्यता नसताना दवाखाना चालवत होता. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोग्य पथकाने सकाळी 11:30 वाजता दवाखान्यात छापा टाकला. यावेळी राऊत रुग्णांवर उपचार करताना आढळून आला. एका महिला रुग्णाने सांगितले की, ती गेल्या अनेक वर्षांपासून राऊतकडून उपचार घेत आहे. राऊत इंजेक्शन्स देणे, औषधे लिहून देणे यासारखी वैद्यकीय कामे करत होता.
या कारवाईदरम्यान दवाखान्यातून स्टेथोस्कोप, बीपी मशीन, सिरिंज, विविध औषधे आणि वैद्यकीय कागदपत्रे जप्त करण्यात आली. कारवाईत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर थेरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप येडमे, बीडीओ किशोर गज्जलवार, विस्तार अधिकारी बंडू जाधव, प्रभारी विस्तार अधिकारी गजानन चेलपेलवार, आरोग्य सेवक मारोती ताजने आणि ग्रामसेवक जे.डी. मेश्राम उपस्थित होते.
बोगस डॉक्टरांद्वारे रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची आवश्यकता आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.



Comments are closed.