अन् जनावरांना घेऊन मनसैनिक शिरले थेट नगर पालिकेत
शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी ढोरकी बनत केले अनोखे आंदोलन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट आणि त्यामुळे वाढलेले अपघातांचे सत्र यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज अनोखे आंदोलन उघडले. मनसेचे वणी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी ‘ढोरकी’चा अवतार धारण केला. शहरातील सर्व मोकाट जनावरे गोळा करून वाजत गाजत थेट नगर परिषदेच्या कार्यालयात नेऊन सोडली. या आंदोलनाने वणीकरांचे लक्ष वेधले. संपूर्ण शहरात सध्या या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होत असून, लहान-मोठे अपघात घडत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मनसेने वारंवार नगर परिषदेला निवेदने दिली, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाला चपराक मारण्यासाठी मनसेने हे ‘ढोरकी’ आंदोलन हाती घेतले.
आज, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी छ. शिवाजी महाराज चौक येथे सर्व आंदोलक गोळा झाले. अंकुश बोढे यांनी गुराख्याचा पोशाख परिधान करत स्वतः आघाडीवर राहिले. त्यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून शहरातील मोकाट जनावरे गोळा केली आणि ढोल-ताशांच्या गजरात नगर परिषदेच्या दिशेने मोर्चा काढला. अचानक जनावरांचा कळप आणि मागे घोषणा देत येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ताफा पाहून नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी गोंधळले. मनसे कार्यकर्त्यांनी नगर परिषद आवारात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.

या आंदोलनाने दबाव वाढल्याने मुख्याधिकारी सचिन गाडे यांना स्वतः बाहेर येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी लागली. मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, शहरातील कोंडवाडे आणि गोशाळांची क्षमता तपासून पुढील सात दिवसांत मोकाट जनावरे त्या ठिकाणी हलवली जातील. या आश्वासनानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले.
अन्यथा मोकाट जनावरे व डुकरं पालिकेत सोडू
शहरातील मोकाट जनावरे, कुत्रे आणि डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही नगर परिषदेला वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. म्हणून आज हे आंदोलन करावे लागले. जर ठोस कारवाई झाली नाही, तर सर्व मोकाट जनावरे, कुत्रे आणि डुकरांना थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सोडू, – अंकुश बोढे, शहराध्यक्ष मनसे
या आंदोलनात मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, धीरज पिदुरकर, शंकर पिंपळकर, मयुर गेडाम, मयुर घाटोळे, गोविंदराव थेरे, रमेश पेचे, लक्की सोमकुंवर, जुबेर खान, योगेश ताडम, हिरा गोहोकार, अहमद रंगरेज, अक्षय बोकडे, गौरव पुराणकर, सूरज पळसकर, वैभव पुराणकर, कृष्णा नीमसटकर, मनिषा नवघरे, हर्षल दांडेकर, कन्हैया पोद्दार, साहिल येरने, सूरज कोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. मनसेच्या या ‘ढोरकी’ आंदोलनाने शहराचे लक्ष वेधले असून, वणीकर आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीची वाट पाहत आहेत.




Comments are closed.