बहुगुणी डेस्क, वणी: दोन गट सामनेसामने आले… त्यांचे एकमेकांशी वाद सुरु झाला… दोघांमधला वाद हातापायीपर्यंत पोहोचला… आणि अचानक तिथे पोलिसांच्या दंगा नियंत्रण पथकाची एन्ट्री झाली… त्यांनी दोन्ही गटाला आवर घालत दंग्यावर नियंत्रण मिळवले. पोलिसांच्या दंगा नियंत्रण मॉकड्रील मधला हा एक प्रसंग आहे. यासह पोलिसांनी विविध शस्त्र, अश्रु बॉम्ब इत्यादी दंगा नियंत्रणाचे प्रात्यक्षिक दाखवले. वणीकरांनी या मॉकड्रीलचा थरार गुरुवारी संध्याकाळी अनुभवला. तसेच पोलिसांनी यातून सामाजिक सलोख्याचा संदेश देखील दिला.
आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण शांततेत व सलोख्याने साजरे करण्यासाठी वणी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिनांक 26 रोजी सायंकाळी 5:00 वाजता टिळक चौक, वणी येथे शहरातील दाट वस्ती व प्रमुख मार्गांवर रूट मार्च काढण्यात आला. त्यानंतर गुरुवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता शासकीय मैदानावर दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक (Mock Drill) घेण्यात आले. या प्रात्यक्षिकात उपविभागातील शिरपूर, पाटण, मुकुटबन, मारेगाव पोलीस स्टेशनमधील अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड जवानांनी सहभाग नोंदवला.
यावेळी जमावाला पांगवण्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा साहित्य, लाठी, हेल्मेट, शिल्ड, गॅस गन, गॅस ग्रेनेड, पंप ॲक्शन गन, एस.एल.आर. रायफल, अश्रू शेल, लाँग रेंज शेल, स्टन शेल, वूड पियर्सिंग सेल आणि डाय मार्कर सेल यांसारख्या शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले. प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन पोलीस मुख्यालय, यवतमाळ येथील कवायत निर्देशक सपोफौ. बाबुसिंग राठोड, पो.हे.काँ. श्रीकांत जयस्वाल, मपोहेकाँ अर्चना सुपारे आणि मपोकाँ पूजा जुमनाके यांनी केले.
प्रात्यक्षिकात वणी पोलीस स्टेशनमधील 5 अधिकारी, 25 अंमलदार आणि 20 होमगार्ड, शिरपूर पोलीस स्टेशनमधील 1 अधिकारी, 5 अंमलदार, मारेगाव पोलीस स्टेशनमधील 1 अधिकारी, 5 अंमलदार, पाटण पोलीस स्टेशनमधील 1 अधिकारी, 4 अंमलदार आणि 3 होमगार्ड, मुकुटबन पोलीस स्टेशनमधील 1 अधिकारी, 1 अंमलदार आणि 3 होमगार्ड, तसेच पों.मु. येथील एस.एफ.चे 9 अंमलदार असे एकूण 9 अधिकारी, 49 अंमलदार आणि 26 होमगार्ड सहभागी झाले.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे आणि पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर यांच्या देखरेखीखाली हे प्रात्यक्षिक पार पडले. या उपक्रमामुळे आगामी सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस विभागाने व्यक्त केला आहे.



Comments are closed.