जीवनसृष्टी…पर्यावरण संरक्षणासाठी सर्पमित्रांचा अनमोल प्रयत्न
हजारो सापांना जीवनदान देणारी हरिष कापसे यांची धाडसी टिम
पुरुषोत्तम नवघरे, वणी: मारेगाव, वणी, झरी, आणि पांढरकवडा उपविभागात पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली जीवनसृष्टी बहुउद्देशीय संस्था सर्पमित्र हरिष कापसे यांच्या नेतृत्वाखाली हजारो विषारी, निमविषारी आणि बिनविषारी सापांना जीवनदान देत आहे. ही संस्था पर्यावरण संरक्षणासाठी युद्धपातळीवर काम करत असून, युवक-युवतींना सामावून घेत त्यांना प्रशिक्षण देऊन पर्यावरण संवर्धनाचे कार्य पुढे नेत आहे.
दिनांक 1 सप्टेंबर रोजी जीवनसृष्टी बहुउद्देशीय संस्थेने आपले दुसरे वर्ष पूर्ण केले. यानिमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिष कापसे यांनी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता संस्थेला अधिक बळकट करण्यासाठी तीन प्रशिक्षित युवतींना संस्थेत सामावून घेतले. हरिष कापसे आणि त्यांची टिम केवळ सापांनाच नव्हे, तर नीलगाय, सांबर आणि पक्ष्यांना देखील मोफत जीवदान देत आहे.
सापांचे प्रकार आणि संरक्षण:
हरिष कापसे यांना सापांच्या विविध प्रजातींचे सखोल ज्ञान आहे. भारतात आढळणाऱ्या सापांमध्ये प्रमुख विषारी सापांमध्ये नाग (कोब्रा), मण्यार (कॉमन क्रेट), घोणस (रसल व्हायपर) आणि फुरसे (स्वास्कील्ड व्हायपर) यांचा समावेश आहे. निमविषारी सापांमध्ये हरणटोळ आणि एडिटर (भारतीय अंडी खाणारा साप) यांचा समावेश होतो, तर धामण, कवड्या, पांदिवड, कुकरी, नानेटी, गवत्या यांसारखे बिनविषारी सापही यात आहेत. या सर्व सापांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जीवनसृष्टी संस्था अथक प्रयत्न करत आहे.
जीवनसृष्टीच्या कार्यात हरिष कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र गजानन क्षीरसागर, अविनाश हीवलेकर, सूरज नथ्थुजी पारशिवे, अर्जुन राठोड, तोहीद शेख, रोहित इनामे, अनिकेत काकडे, धनराज मतिरे, घनश्याम चौधरी, आर्यन कवाडे, मनोज मोंढे, पूजा कोवे, सोनू हनुमान पेंडोर, पूजा लखमा आत्राम यांच्यासह अनेक युवक-युवती सक्रियपणे सहभागी आहेत. ही टिम वणी, मारेगाव, झरी आणि पांढरकवडा परिसरात पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत आहे.
जीवनसृष्टी बहुउद्देशीय संस्था सापांच्या संरक्षणाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जैवविविधतेचे जतन करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहे. नवीन सभासदांचा समावेश आणि प्रशिक्षणाद्वारे ही संस्था पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात एक आदर्श ठरत आहे. आपल्याही परिसरात साप निघाल्यास किंवा एका जनावर रेस्क्यू करायचे असल्यास संपर्क साधावा असे आवाहन हरीश कापसे यांनी केले आहे.



Comments are closed.