रेतीची तस्करी, मुर्धोनी परिसरात मध्यरात्री पोलिसांची रेड

ट्रॅक्टर व रेती जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत दोघांना अटक केली. या प्रकरणी सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 8 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 2 वाजताच्या दरम्यान मुर्धोनी परिसरात गस्त घालताना करण्यात आली. पोलिसांनी आरोपी विलास रमेश आडे (वय 30, रा. वागदरा) आणि तुळशिराम भगवान काकडे (वय 32, रा. गोकुळ नगर, वणी) यांना अवैध रेती वाहतूक करताना रंगेहाथ पकडले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्राप्त माहितीनुसार, मुर्धोनी परिसरात रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास मुर्धोनी परिसरात गेले असता तिथे त्यांना एक विना नंबरचा लाल रंगाचा ट्रॅक्टर आढळला. या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती होती. पोलिसांनी रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता चालकाकडे कोणताही परवाना नव्हता. त्यानुसार 1 ब्रास रेती व ट्रॅक्टर असा एकूण 6,56,000 (सहा लाख छप्पन्न हजार) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर बीएनएसच्या कलम  303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वणी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी गोपाळ उंबरकर यांच्या आदेशाने पार पाडली. पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम, विकास आणि वसीम यांनी या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे हे करीत आहेत. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा ठोस प्रयत्न दिसून येत असून, स्थानिक नागरिकांनी याचे स्वागत केले आहे.

Comments are closed.