रंगारीपुरा महाकाली मंदिराजवळ कच-याचे साम्राज्य – नागरिकांत संताप

मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात स्थानिक धडकले पालिकेत...

बहुगुणी डेस्क, वणी: रंगारीपुरा येथील नदीकिनारी असलेल्या महाकाली मंदिरात रोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. सध्या सण-उत्सवाचा काळ असल्याने भाविकांची संख्या आणखी वाढली आहे. मात्र मंदिर परिसरात झाडं-झुडपं वाढलेली असून, मोठ्या प्रमाणात कचरा आणि सांडपाणी साचल्याने दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या भागाची तातडीने साफसफाई करावी, अशी मागणी वार्ड क्र. 19 व 21 मधील नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात स्थानिक महिला व रहिवाशांनी नगरपालिकेला भेट देऊन निवेदन सादर केले.

स्थानिकांचे म्हणणे आहे की, नदीकाठावरील परिसरात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता कचरा व घाणीने भरलेला असतो. सध्या पावसाळ्यामुळे येथे विंचू व सर्पदंशाचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अखेर या भागातील महिलांनी पालिकेत धडक देत परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली. 

काही अनुचित प्रकार घडल्यास पालिका जबाबदार
नदी काठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाण्यामुळे कचरा वाढला आहे. गेल्या वर्षी शास्त्री नगर येथे एका चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पालिकेने साफसफाईकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उद्या या परिसरात सर्पदंशासारखी काही अनुचित घटना घडल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहणार. – अंकुश बोढे, शहराध्यक्ष मनसे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रस्ता कधी बांधणार ? स्थानिकांचा सवाल
या भागात सिमेंट रोडचे काम सुमारे 20-22 वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतर वेळोवेळी पाणीपुरवठा कनेक्शनसाठी रस्ता फोडण्यात आला, त्यामुळे रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. नगरपरिषदेकडे वारंवार विनंती करूनही रस्ता अद्याप बांधण्यात आलेला नाही. इतर भागात सिमेंट रस्ते झाले असताना आमच्या भागाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत आमदारांनाही रंगारी पुरा येथील रहिवाशांनी निवेदन दिले आहे. 

निवेदन देते वेळी शरद पिसे, राहुल पिसे, सुनिता पाल, रेखा पाल, दुर्गा निंबाळकर, सरिता निंबाळकर, मोहिनी पाल, चंदा कोंत्तलवार यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Comments are closed.