16 वर्षीय मुलगी बेपत्ता: पळवून नेल्याचा संशय

लहान बहिणीला चॉकलेटसाठी पैसे देऊन झाली गायब...

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील एका 16 वर्षीय कुमारिका बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (दि. 7 सप्टेंबर) दुपारी साडेअकराच्या सुमारास घरातून बाहेर पडलेली ही मुलगी आजतागायत घरी परतली नाही. तीन दिवसांच्या निष्फळ शोधानंतर बुधवारी तिच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीला कुणीतरी फुसवून पळवून नेल्याचा संशय असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 137 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, पीडित मुलगी ही वणीतील एका भागातील रहिवासी आहे. रविवारी दुपारी ती तिच्या लहान बहिणीसोबत दुकानात गेली होती. तिने बहिणीला 5 रुपये देऊन चॉकलेट आणण्यास सांगितले आणि स्वतः खर्रा घेते असे सांगितले. लहान बहिण चॉकलेट घेऊन परत आल्यावर तिला तिची मोठी बहिण दिसली नाही. ती घरी गेली असेल असे वाटले, मात्र घरीही ती नव्हती. मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या पालकांनी वणी परिसरात शोध घेतला तसेच नातेवाईक व मित्रमैत्रिणींना चौकशी केली, पण मुलीचा काहीही पत्ता लागला नाही.

मुलीला कोणीतरी तिला फुसवून पळवून नेल्याचा संशय तिच्या पालकांना आला. त्यामुळे तिच्या आईने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली.पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 137 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

Comments are closed.