पुरुषोत्तम नवघरे, वणी: लायन्स क्लब वणी, वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, नार्ची नागपूर चॅप्टर मेनोपॉज सोसायटी नागपूर आणि असोसिएशन ऑफ सर्जन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी लायन्स स्कूल, देशमुखवाडी येथे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात विविध कॅन्सर तपासण्या करण्यात आल्या. यात 17 पॅप स्मीअर तपासण्या, 42 कल्पोस्कोपी तपासण्या तर 141 महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. तसेच डॉ. पूजा सावजी यांनी महिलांना कॅन्सरची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन केले.
शिबिराचे उद्घाटन लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते झाले. मंचावर डॉ. निर्मला वझे, लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला, सचिव प्रा. अभिजीत अणे, सुधीर दामले, सौ. मंजिरी दामले व डॉ. विद्या सुतवणे उपस्थित होते.
“कॅन्सर सारख्या आजाराचे वेळीच निदान झाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे,” असे मनोगत लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले.
या शिबिरात वणी व परिसरातील 141 महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. काही महिलांनी प्रथमच कॅन्सर तपासणी करून समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील महिलांसाठी वैद्यकीय सुविधा दुर्गम असल्याने अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित झाले.
शिबिरात नागपूर व वणी येथील नामांकित डॉक्टरांचे पथक सहभागी झाले. डॉ. निर्मला वझे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विद्या सुतवणे, डॉ. पारुल सावजी, डॉ. प्राची उईके, डॉ. उज्ज्वला देशमुख, डॉ. भावना पांडा, डॉ. वैष्णवी वानखेडे, डॉ. सीमा बिस्वास, डॉ. शरयू वानखेडे, डॉ. ऋतुजा रुईकर, डॉ. मानसी ठाकरे, डॉ. प्राजक्ता बरडे यांच्यासह स्थानिक डॉक्टर डॉ. पल्लवी, डॉ. सोनू शेडामे, डॉ. प्रणाली पावडे, डॉ. श्वेता ठाकरे, डॉ. जयश्री एकरे व डॉ. प्रद्या महाजन सहभागी झाले.

शिबिराला लायन राजाभाऊ पाथ्रडकर, लायन किशन चौधरी, लायन बलदेव खुंगर, लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन महेंद्र श्रीवास्तव, लायन डॉ. विजय राठोड, लायन नंदलाल शुगवाणी, लायन प्रमोद देशमुख, लायन सुनीता खुंगर, लायन वीणा खोब्रागडे, प्रशांत गोडे (अकॅडेमिक डायरेक्टर), प्राचार्य चित्रा देशपांडे उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टर, मदतनीस व नर्स यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. सौ. मंजिरी दामले यांनी प्रास्ताविक केले, तर लायन अभिजीत अणे यांनी आभार मानले. लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.





Comments are closed.