पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासन दरवर्षी आदर्श गणेशोत्सव मंडळांचा सन्मान करतो. यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श गणेशोत्सव मंडळ पुरस्कार वणीतील ऐतिहासिक श्री रंगनाथ स्वामी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला जाहीर झाला. यवतमाळ येथील सभागृहात या मंडळाचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानाबाबत मंडळाचे कौतुक होत आहे व इतर गणेश मंडळांनी देखील याचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
श्री रंगनाथ स्वामी या मंडळाची सण 1932 साली या गणेश मंडळाची स्थापना झाल्याचे सांगितले जाते. स्थापनेपासूनच पारंपरिक पद्धतीने मूर्तीची स्थापना व संपूर्ण उत्सव साजरा केला जातो. गेल्या अनेक दशकांपासून इतरांना आदर्श ठरेल अशी गणेशोत्सवाची परंपरा जोपासणारे हे मंडळ आज वणीच्या गणेशोत्सवाचे मानबिंदू ठरले आहे. परंपरिक मूर्ती स्थापना, साधेपणाने पण भक्तिभावाने केलेला उत्सव, तसेच विसर्जनातील आगळेपणामुळे मंडळाला विशेष ओळख आहे.
मूर्ती मानधन फक्त ‘ऐच्छिक’
वणीतील सुप्रसिद्ध मूर्तीकार दिवंगत बबन टेंभूरकर यांनी तब्बल 50 वर्षांपेक्षा अधिक काळ मंडळासाठी मूर्ती साकारली. विशेष म्हणजे – फक्त एक रुपया मानधन घेऊन त्यांनी गणेशभक्ती जोपासली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र बंडू टेंभूरकर हाच वारसा पुढे नेत आहेत. आजही मूर्तीचे मानधन ऐच्छिकच असते. ही परंपरा मंडळाचा मोठा अभिमान आहे.
“नो डीजे, नो बँड” – विसर्जनाची ओळख
इतर मंडळांप्रमाणे डीजे-बँडचा गोंगाट न करता, पदावली भजनी मंडळाच्या तालावर मूर्तीचे विसर्जन केले जाते. विसर्जनाच्या एक दिवस आधी रात्री उशिरा मूर्ती सज्ज करून ठेवली जाते आणि पहाटे 6 वाजता विसर्जन सोहळा सुरू होतो. पारंपरिक वाद्यांचा नाद, टाळ-मृदंगाचा गजर, भक्तिगीतांचा जयघोषात विसर्जन केले जाते. दरवर्षी एक भजनी मंडळ यासाठी बोलावले जाते. यावर्षी डोंगरगाव येथील पदावली भजनी मंडळाने वाद्यवृंदाची जबाबदारी सांभाळली होती. विशेष म्हणजे मिरवणुकीत गुलाल उधळला जात नाही किंवा कुणी नाचत नाही. असतो तर फक्त हरीनामाचा गजर. त्यामुळे भक्तीरसात न्हाउन निघालेली विसर्जन मिरवणूक आगळीवेगळी ठरते. वाहतूक कोंडी टळावी आणि वणीकरांना त्रास होऊ नये म्हणून दुपारी 12 वाजेपर्यंत विसर्जन संपवले जाते.
यावर्षी यवतमाळ येथील प्रेरणा सभागृहात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. कुमार चिंता यांच्या हस्ते श्री रंगनाथ स्वामी मंडळाचा गौरव करण्यात आला. वणी पोलीस प्रशासनानेही मंडळाचा विशेष सत्कार केला.

या पुरस्काराबद्दल मंडळाचे अध्यक्ष मनोहर वरारकर, सचिव विलास पारखी, उपाध्यक्ष विनायक पिदुरकर तसचे सदस्य पदमाकर झिलपे, विनायक डहाळकर, पांडुरंग दुधलकर, वामण नांदे, हरिभाऊ गोहोकार यांनी जिल्हा पोलीस प्रशासन, वणी पोलीस स्टेशन तसेच गणेशोत्सवात सक्रिय सहभाग घेतलेल्या सर्व सदस्य व नागरिकांचे आभार मानले.





Comments are closed.