मटका पट्टीवर पोलिसांचा धाडसी छापा, 17,500 चा मुद्देमाल जप्त

जत्रा मैदानाजवळील मंदिराजवळ मटका, एक इसम लागला पोलिसांच्या हाती

बहुगुणी डेस्क, वणीवणी पोलिसांनी जत्रा मैदानाजवळ सुरु असलेल्या एका मटका अड्ड्यावर धाड टाकली. मंगळवार, दि. 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या छाप्यामध्ये मटका पट्टी फाडणारा इसम पोलिसांच्या हाती लागला, या प्रकरणी पट्टी फाडणारा व मटका चालक अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी 7,500 रुपये रोख, दोन मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे 17.500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

वणी पोलीस ठाण्याचे पोउनिरीक्षक अंकुश वडतकर हे त्यांच्या सहका-यांसह पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना जत्रा मैदान जवळील हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या एका बंद टपरीवरून वरली मटका सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली. साडेपाच वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक या ठिकाणी गेले. त्यांनी तिथे छापा टाकला. छापा पडताच घटनास्थळी एकच पळापळ झाली. यावेळी मटका पट्टी फाडणा-या इसमाला जागीच पकडले. मात्र मटका लावणारे लोक पोलिसांची चाहूल लागताच पळून गेलेत.

संदीप कृष्णय्या चिलूकला असे पोलिसांच्या हाती लागलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याचे नाव संदीप कृष्णय्या चिलूकला (वय 55 वर्ष, कवडपल्ली, ता. अब्दुल्लापुरमेट, तेलंगणा) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांना 7500 हजार रुपये रोख व दोन फोन आढळून आले. संदीप चिलूकला याची चौकशी केली असता त्याने सदर वरली मटका जुगाराचा व्यवसाय अफसर शेख अजीज शेख (रा. वाघदरा, ता. वणी, जि. यवतमाळ) चालवतो. संदीप हा मटक्याचे आकडे लिहतो व लोकांकडून  पैसे गोळा करून अफसर शेख यांना देतो. त्या बदल्यात मटका चालक अफसर शेख हा संदीपला 1 हजार रुपये रोख मजुरी देत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी मटका पट्टी फाडणारा व मटका चालक या दोघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (कलम 12 अ) आणि बीएनएसच्या कलम 49 अंतर्गत गुन्हा दाखल केला. सदर कारवाई ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या मार्गदर्शनात व वणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी सचिन पिंपळकर, आकाश अवचारे, शंकर चैधरी आणि मिथून राउत यांनी केली. 

Comments are closed.