बस चालकाला बसमध्ये शिरून मारहाण; आरोपीवर गुन्हा

चालत्या बस समोर दुचाकी लावून थांबवली बस

विवेक तोटेवार, वणी: विरकुंड–बोर्डा मार्गावर शाळेच्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात असलेल्या एस.टी. बस चालकाला एका दुचाकीस्वाराने रस्त्यात अडवून बसमध्ये शिरत मारहाण केली. ही घटना शुक्रवार, 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6.15 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी पायघन (37, रा. बोर्डा) याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे व मारहाण प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तक्रारीनुसार, बस चालक सुनील मोतीराम नैताम (50, रा. वाघदरा जुना) हे वणी आगारातील चालक म्हणून काम करतात. ते शुक्रवारी सकाळी एस.टी. बस (MH-40 AQ-60620) घेऊन वणीहून विद्यार्थी आणण्यासाठी ग्राम बोर्डा येथे जात होते. दरम्यान, विरकुंड -बोर्डा मार्गावर पायघन याने चालत्या बस समोर त्याची दुचाकी (MH-29 BW-8150) आडवी लावून बस थांबवली. त्याने बसमध्ये शिरून चालकाला शिवीगाळ केली आणि “फुकटची नोकरी लागली” असे म्हणत चालकाला कॉलर पकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

त्या वेळी बसचा वाहक संजय नान्ने मदतीला धावून आला असता, पायघनने हातातील लाकडी काठीने बस चालक सुनील नैताम यांच्या उजव्या खांद्यावर प्रहार केला. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सदर वाद हा साईड देण्यावरून झाल्याची माहिती आहे. या घटनेत शासकीय कामात अडथळा आणल्याने वणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध BNS कलम 132, 121(1), 352 नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सपोनी निलेश अपसुंदे करीत आहेत.

Comments are closed.