बहुगुणी डेस्क, वणी: वागदरा येथील एका घरी धाड टाकून मोबाईलद्वारे सुरू असलेला मटका जुगार पोलिसांनी उधळला. या कारवाईत पोलिसांनी चौघांना रंगेहाथ पकडले असून घरमालकासह 5 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मंगळवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत एकूण 8 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे या कारवाईच्या एक आठवडा आधी जत्रा मैदानावरील एका मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. याच मटका चालकाच्या घरी आता छापा टाकण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना खबरीकडून वागदरा येथील एका घरी मटका सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी त्यांचे पथक वागदरा येथील अफसर शेख याच्या घरी पाठवले. तिथे त्यांनी वरच्या माळ्यावर छापा टाकला. दरम्यान खोलीत मोबाईलच्या माध्यमातून वरली मटका नावाचा जुगार सुरू असल्याचे आढळले. पोलिसांनी ऑन स्पॉट चौघांना अटक केली.
यासीन मेहबुब खान (वय 27, रा. शास्त्री नगर वणी), राहुल उल्हासराव वन्हाडे (वय 39, रा. नटराज चौक वणी), उदय दुर्वास पाटील (वय 24, रा. शास्त्री नगर वणी) व पवन प्रकाश मडावी (वय 24, रा. रंगनाथ नगर वणी) या चौघांना ताब्यात घेतले. याशिवाय घरमालक अफसर शेख (रा. वागदरा) याच्यावर देखील कारवाई करण्यात आली. झडतीदरम्यान आरोपींकडून नगदी 2 हजार 260 रुपये, विविध मोबाईल हँडसेट, सी-टाईप चार्जर, एक्स्टेंशन बोर्ड व जुगाराचे साहित्य असा एकूण 8 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पीएसआय प्रियंका चौधरी करीत आहेत. सदर कारवाई एसडीपीओ पथकाने केली.



Comments are closed.