वणीत ठिकठिकाणी पथदिवे बंद, मनसेचा बंद पथदिव्यांचा पंचनामा
मनसेचे अनोखे सर्च ऑपरेशन, शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा अल्टिमेटम खासदारांच्या कार्यालयासमोरील पथदिवेही बंद
पुरुषोत्तम नवघरे,वणी: वणी शहरात ठिकठिकाणी पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याचा पंचनामा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शहरात अनोखे सर्च ऑपरेशन राबवले. मनसेने विठ्ठलवाडी, प्रगती नगर, वरोरा रोड आणि जैन लेआऊट भागात पथदिव्यांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी पथदिवे बंद आढळले, तर काही ठिकाणी पथदिव्यांची सोयच नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, खासदारांच्या वणी येथील कार्यालयासमोरील पथदिवेही बंद असल्याचे आढळले. याबाबत मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात नगर पालिकेत निवेदन देण्यात आले. एका आठवड्यात पथदिवे सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
शहरातील बंद पथदिव्यांबाबत मनसेने अनोखे सर्च ऑपरेशन सुरू आहे. यात मनसेच्या टीमने शहरातील विठ्ठलवाडी, प्रगती नगर, वरोरा रोड व जैन लेआऊट भागात दौरा केला असताना त्यांना ठिकठिकाणी पथदिवे बंद आढळले. यात
तुकडोजी महाराज पुतळ्या जवळील मोहितकर ट्युशन जवळ, आशा बार जवळचा एक पथदिवा बंद तसेच या रस्त्यावर एक ही पथदिवा नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती रोडवरचे संपूर्ण पथदिवे बंद. पट्टाचारा परिसर रेल्वे स्टेशन जवळील संपूर्ण पथदिवे बंद. प्रगती नगर ते उड्डाण पूल रोडवर सर्व पथदिवे बंद आढळले.
खासदारांच्या कार्यालयासमोरीलच पथदिवे बंद
प्रगती नगर गेट, श्री झेरॉक्सच्या समोरच्या लाईट बंद. पाण्याची टाकी, साई दरबार समोर खासदार यांचे कार्यालय, जैन लेआउट जवळील मुन्ना पान शॉप च्या समोरून हायवेला टच होणारा रोडवर एकही पथदिवा नाही. बल्की यांच्या घरासमोर अन्नपूर्णा केटरर्सच्या समोरचे पथदिवे बंद तसेच ओमकार नगरी गेटच्या समोरील पथदिवे बंद आढळले.
या समस्येबाबत मनसेने शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात नगर पालिकेत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. बंद पथदिवे त्वरित सुरू करण्याची मागणी करत एका आठवड्याचा अल्टिमेटम देण्यात आला. जर पथदिवे सुरू झाले नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसेने दिला. निवेदन देताना क्रिष्णा निमसटकर, शंकर पिंपळकर, सूरज पळसकर, हिरा गोहोकार यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.
मनसेच्या या सर्च ऑपरेशनमुळे शहरातील बंद पथदिव्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता नगर पालिका यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Comments are closed.