वणी-मारेगाव रोडवर दुचाकी अपघात; सेवानिवृत्त शिक्षकांचा मृत्यू

बँकेच्या समोर दुचाकील धडक; वाटेतच प्राणज्योत मालवली

बहुगुणी डेस्क, वणी: घरी दुचाकीने जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने समोरील दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मारेगाव येथील सेंट्रल बँक समोर घडली. मुकुंदराव पत्रुजी राजूरकर (वय 62, रा. मारेगाव) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राजूरकर हे मारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. आज दुपारी ते कामासाठी गावातील बँकेत गेले होते. बँकेतील काम आटोपून ते त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीने घरी परतत असताना ही घटना घडली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने राजूरकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे ते रस्त्यावर फेकले गेले आणि डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली.

अपघात होताच स्थानिकांनी त्यांना आधी मारेगाव व नंतर तात्काळ वणी येथे नेले; मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मुकुंदराव राजूरकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि इतर कुटुंबीय असा परिवार आहे.

Comments are closed.