सावंगी जुनी येथे तीन दिवसीय जगदंबा महोत्सव

आजपासून 3 दिवस विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सावंगी जुनी (ता. वणी) येथे जगदंबा माऊली देवस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने तीन दिवसीय जगदंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 1 ते 3 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

मंदिर परिसरात तीन दिवस दीपोत्सव, तोरण व पताका सजावट केली जाईल. 1 नोव्हेंबर रात्री भजन कार्यक्रम होईल. 2 नोव्हेंबर रात्री भारुडाचार्य सागर महाराज नंदुरकर (अजूनसरा) यांच्या देवी गोंधळातून प्रबोधन सादर होईल; मृदुंग सम्राट समीर महाराज वैद्य यांची साथसंगत लाभेल. 3 नोव्हेंबर सकाळी 6 वाजता ग्रामसफाई व रस्त्यांवर रांगोळी सजावट होईल. सकाळी 10 वाजता देवीपूजन, बैलजोडी पालखीमध्ये देवीची प्रतिमा ठेवून ग्रामदैवतांचे नमन करीत गावात दिंडी काढली जाईल. दुपारी 4 वाजता संत खेमराज महाराज यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडी फोडून महाप्रसाद वितरण सुरू होईल.

पंचक्रोशीतील भाविक, भजन मंडळे, गावाबाहेरील गणगोत व सासुरवाशी मुली मोठ्या संख्येने सहभागी होतात. गेल्या अनेक वर्षांपासून कार्तिक पाडव्याला हा महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. संतदर्शन, आशीर्वाद व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांनी केले आहे.

Comments are closed.