प्रदूषणाविरुद्ध रणशिंग, पाणीटंचाईवर तोडगा – निखिल एकरे उतरणार मैदानात

ओळख इच्छुक उमेदवारांची: प्रभाग क्र. 1 मधून नव्या उमेदवाराची एन्ट्री

बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 1 मध्ये एक नव्या उमेदवाराची दमदार एन्ट्री झाली आहे. बँक कॉलोनी परिसरातील रहिवासी, सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय आणि विविध आंदोलनांतून जनतेच्या प्रश्नांना आवाज उठवणारे निखिल वसंतराव एकरे हे आता लोकप्रतिनिधी म्हणून मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. ‘सामाजिक कार्यकर्ता’ ही त्यांची ओळख आता ‘जनतेचा हक्काचा आवाज’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पाणीटंचाई आणि रेल्वे सायडिंगमुळे होणारे प्रदूषण या गंभीर समस्यांना तोडगा काढण्याचे रणशिंग त्यांनी फुंकले आहे.

निखील एकरे यांचा थोडक्यात परिचय
निखिल एकरे हे वणीतील बँक कॉलोनी परिसरातील रहिवासी आहे. बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. मात्र त्यांनी पुढे शिक्षण घेण्याऐवजी किंवा नोकरी करण्याऐवजी व्यवसाय हा पर्याय निवडला. त्यांचे नांदेपेरा रोडवर रेस्टॉरन्ट आहे. ते गेल्या 10 वर्षांपासून रेस्टॉरन्ट क्षेत्रात कार्यरत आहे. व्यवसायाच्या जोडीने सामाजिक बांधिलकी जपण्याची त्यांची तळमळ कधीच कमी झाली नाही. ते शहरातील धार्मिक कार्यात कायम अग्रेसर राहतात. त्यांनी एका पक्षात देखील काम केले आहे. या पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मात्र, आता पक्षविरहित मार्ग स्वीकारत त्यांनी थेट जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केला आहे.

प्रदूषणाचा मुद्दा अग्रक्रमावर
रेल्वे सायडिंगमुळे या भागात सर्वात प्रमुख समस्या ही प्रदूषणाची आहे. प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा हा मुद्दा अग्रक्रमावर राहणार आहे. यासह पाणीटंचाईसह या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे, असे मत निखिल एकरे व्यक्त करतात. त्यांच्या मते, लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ निवडणुकीपुरता चेहरा नसून, जनतेच्या प्रत्येक समस्येचा भागीदार असावा, असे ते म्हणतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रभाग क्रमांक 1 मध्ये सहारा पार्क, विद्यानगरी, बँक कॉलोनी, आयटीआय कॉलोनी, गुलमोहोर पार्क, विठ्ठलवाडीचा काही भाग, रविनगरचा काही भाग तसेच रेल्वे पटरीजवळील वस्ती यांचा समावेश होतो. या भागात पाणीटंचाई, कोळशामुळे होणारे प्रदूषण तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव ही प्रमुख अडचण आहे. नागरिक आता सशक्त, कष्टाळू आणि लोकाभिमुख नेतृत्वाच्या शोधात आहेत.

निखिल एकरे यांची उमेदवारी ही केवळ निवडणुकीतील एक पर्याय नसून, ती प्रभागाच्या नव्या भविष्याची सुरुवात ठरू शकते. अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व देण्याचा निर्धार करत त्यांनी त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांना घाम फुटला असल्याची प्रतिक्रिया वणी बहुगुणीजवळ व्यक्त केली. (आपणही नगर पालिकेसाठी इच्छुक असाल तर 9096133400 (संपादक वणी बहुगुणी) या क्रमांकावर संपर्क साधा.)

Comments are closed.