भालर येथे शेतक-याची शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या

भालर हादरले : एका आठवड्यात दुसरी आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील भालर गाव पुन्हा एकदा हळहळले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी एका महिलेने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता शेतकरी संजय भावराव लाडे (वय 49) यांनीही शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रात्री शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपवली. या सलग घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण पसरले असून, तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची मालिका चिंताजनक ठरत आहे.

प्राप्त माहितीनुसार, संजय लाडे यांची भालर शेतशिवारात शेती आहे. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने चिंता व्यक्त झाली. मुलगा शोध घेण्यासाठी शेतात गेला असता, वडिलांना निपचित अवस्थेत आढळले. विष प्राशन केल्याचे लक्षात येताच त्याने कुटुंबियांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

2 नोव्हेंबर रोजी भालर येथीलच एका महिलेने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत संजय लाडे यांची आत्महत्या झाल्याने गावक-यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. संजय लाडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक चर्चा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Comments are closed.