चोरट्यांचा “दारू डल्ला” : करणवाडी बिअरबारमध्ये मध्यरात्री हैदोस !
रोख रकमेसह 25 हजारांची दारू लंपास, सिगारेटचे झुरके मारत चोरी
बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील करणवाडी नजीकच्या एका बारमध्ये मध्यरात्री काही “दारूप्रेमी चोरटे” आले आणि शटर फोडून आत प्रवेश केला. CCTV कॅमेरा फोडून त्यांनी आत “VIP पार्टी” सुरू केली. सुमारे 40 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
करणवाडी नजीक रघुकूल बार नावाचे एक बार अँड रेस्टॉरन्ट आहे. बारचे संचालक सोमवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री बार बंद करून घरी गेले. दरम्यान मध्यरात्री बारजवळ 5 चोरटे आले. त्यांनी शटर फोडून बारमध्ये प्रवेश केला. सीसीटीव्ही फोडली व विदेशी दारूच्या बाटल्या उचलल्या, रोख 15 हजार रुपये खिशात टाकले आणि वरती सिगारेटचे झूरके ओढत “बारचा फ्री एंटरटेनमेंट” घेतला.
बार संचालक विनीत जयस्वाल सकाळी बार उघडायला गेले तर दृश्य पाहून थक्क झाले – शटर व सीसीटीव्ही फोडलेले व बाटल्या गायब दिसल्या. त्यांनी तातडीने सीसीटीव्ही बॅकअप चेक केला असता मध्यरात्री झालेला सर्व प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी गल्यातीत सुमारे 15 हजारांची रक्कम व सुमारे 25 हजारांच्या मालावर डल्ला मारला.
दरम्यान, हे चोरटे परप्रांतातील असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बार मालकाने याबाबत मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.



Comments are closed.