विवेक तोटेवार, वणी: वणीतील एका ज्येष्ट पत्रकाराला एका अवैध व्यावसायिकाने मारहाण केली. मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास जत्रा रोडवरील नागिना मस्जिद समोर ही घटना घडली. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा प्रकार घडला. पत्रकाराच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फारुख हारून चिनी हे दुपारी दुकानाकडे जात असताना नागिना मस्जिदसमोर पोलिसांच्या गाड्या उभ्या दिसल्या. ते तिथे चौकशीसाठी थांबले. दरम्यान आरोपी अब्दुल हफीज अब्दुल सत्तार (40, रा. मोमीनपुरा) याने त्यांच्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर फारुख यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले आणि त्यांना मारहाण केली. या झटापटीत फारुख यांचा चष्मा फुटला.
फारुख यांची यावर्षी जानेवारी महिन्यात हैद्राबाद येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी झाली होती. त्यामुळे झालेल्या मारहाणीमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अब्दुल हफीज याच्याविरुद्ध कलम 296, 351(2), 351(3), 324(4), 324(5), 115 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास वणी पोलिस करीत आहेत. आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत.



Comments are closed.