राजू किसन तुराणकर : लोकसेवेतून घडलेलं नेतृत्व
नवीन ले आउटमधील मुलभूत समस्या राहणार अग्रक्रमावर
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगर परिषद निवडणुकीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 ब मधून अडल्या नडल्यांच्या मदतीला सदैव धावून जाणारा शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक राजू किसन तुराणकर हे उभे आहेत. लोकांची समस्या सातत्याने मांडणारा कार्यकर्ता, समस्यांचा सातत्याने पाठपुरावा करून समस्या सोडवणारा कार्यकर्ता अशी त्यांची वार्डातच नाही तर संपूर्ण वणी शहरात ओळख आहे. शिवसेना (उबाठा), काँग्रेस, मनसे या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
राजू तुराणकर यांचा परिचय
राजू किसन तुराणकर हे सर्वसामान्य कुटुंबातून येतात. ते व्यावसायिक आहे. सोबतच ते वृक्षप्रेमीही आहेत. आवडीच्या क्षेत्राला व्यवसाय करण्याच्या उद्देशाने त्यांचा व्यवसाय देखील नर्सरीचा आहे. त्यांनी बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. शिवसेनेशी त्यांचे घट्ट नाते आहे. विद्यार्थी दशेपासूनच ते शिवसेना प्रणीत विद्यार्थी सेनेशी जुळले. ते विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख होते. या काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मांडल्या व त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणूनही काम केले. एक टर्म ते नगरसेवक देखील होते. त्यामुळे त्यांना पालिकेच्या कामाचा चांगला अनुभव आहे.
नगरसेवक असतानाचा कार्यकाळ
2006 ते 2011 या कालावधीत ते वार्ड क्रमांक 6 मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या काळात जैन लेआऊटसह भोंगळे, आवारी, फाले लेआऊट, साने गुरुजी नगर, बजरंग नगर ही वस्ती वसण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे या नवीन भागात पाणी समस्या व मुलभूत सुविधांचा अभाव होता. या नवीन वस्तीच्या समस्या सोडवण्यास त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आज या भागात रस्ते, स्ट्रीट लाईट व ड्रेनेज व्यवस्था तयार झाली आहे. याचा पाया राजू तुराणकर यांनी रचला होता. या पालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी या समस्या उचलून धरल्या, याचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या नवीन भागात विकासकामांना सुरुवात झाली. याचे श्रेय वार्डातील नागरिक राजू तुराणकर यांना देतात.

प्रभागातील प्रमुख समस्या
प्रभाग क्रमांक 2 मध्ये आवारी ले आऊट, फाले ले आऊट, भोंगळे ले आऊट, बजरंग नगर, प्रगती नगर, ढुमे नगर, जुना कॉटन मार्केट, पंचवटी अपार्टमेंट, जनता शाळेजवळील परिसर, गणेश गृह निर्माण सोसायटी व पट्टाचारा नगर येथील काही भागाचा समावेश होतो. ही नवीन वस्ती असल्याने सातत्याने वस्ती वाढत आहे. त्यामुळे या भागात मुलभूत समस्यांचा डोंगर आहे. यातील प्रमुख समस्या म्हणजे ड्रेनेज सिस्टिमची आहे. अनेक ठिकाणी अंडरग्राऊंड नाली नाही. नवीन वस्ती किंवा लेआऊटमध्ये सांडपाणी जाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे रिकाम्या प्लॉटवर व परिसरात सांडपाणी साचते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. ओपन स्पेसवर सांडपाणी साचल्याने परिसरातील मुलांना खेळण्यासाठी जागा नाही. त्यामुळे ड्रेनेज सिस्टिम सुधारणे व तयार करणे हा मुद्दा त्यांच्या निवडणूक अजेंड्यात अग्रक्रमावर राहणार आहे.
या प्रभागात नवीन वस्ती असल्याने काही भागात रस्त्यांची समस्या आहे. ही समस्या दूर करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. परिसरात अनेक ठिकाणी ओपन स्पेस आहे. या ठिकाणी बाग तयार करणे तसेच ठिकठिकाणी ओपन जीम तयार करण्याचा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर आहे. प्रगती नगर व गणेश गृह निर्माण सोसायटी येथे ओपन जीम उभारण्यासाठी त्यांनी सातत्याने मागणी केली व पाठपुरावा करून ती सुविधा उपलब्ध करून दिली. याच प्रकारे ठिकठिकाणी जीम व बाग तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.

सामाजिक कार्यात कायम अग्रेसर
राजू तुराणकर यांचा पिंड राजकारणापेक्षा सामाजिक कार्याचा आहे. त्यांचे नगरसेवक नसतानाही सामाजिक कार्य सुरु होते. लोकांच्या समस्या ते कायम मांडत असतात. त्यांचे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम सुरु असते. कोरोना काळातही त्यांचे कार्य सुरु होते. राजू तुराणकर यांनी लोकांना धान्यवाटप, औषधांचे वाटप, वार्ड निर्जंतुकीकरण, चष्मे वाटप, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवले.
शिवसेना (उबाठा) तर्फे प्रभाग क्रमांक 2 ब मधून उमेदवारी मिळालेल्या राजू किसन तुराणकर यांची ओळख ही केवळ पक्षाचा उमेदवार म्हणून नाही, तर लोकांच्या समस्या सातत्याने मांडणारा, त्यावर उपाययोजना करणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता आहे. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात त्यांची वाटचाल सुरु आहे. त्याला काँग्रेस व मनसेचे पाठबळ मिळाले आहे. त्यांची उमेदवारी ड्रेनेज व्यवस्था सुधारणे, रस्ते व बागांची उभारणी यांसारख्या ठोस उपाययोजनांच्या दिशेने आश्वासक पाऊल ठरू शकते.



Comments are closed.