लालपुलिया येथे भीषण अपघात: महिलेचा जागीच मृत्यू

हायवाच्या बेसावध चालकाने चिरडले; मायेच्या छायेला मुकले तीन मुले

विवेक तोटेवार, वणी : बुधवारी सायंकाळी अंदाजे 4 वाजताच्या सुमारास वणी येथील लालपुलिया परिसरात गुल पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचे नाव नाजमीम मकसूद शेख (वय 42), रा. लालपुलिया असे आहे. त्या आपल्या दुचाकीत पेट्रोल भरून बाहेर पडत असताना यवतमाळकडून वणी कडे येणाऱ्या हायवा (क्रमांक CG 04 MM 1903) ने त्यांना जोरदार धडक दिली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला गाडीवर थांबलेल्या अवस्थेत होत्या. हायवा येताना त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हायवा चालकाने वेग नियंत्रित न केल्याने हा अपघात झाला. या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेची माहिती मिळताच पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास वणी पोलिस ठाण्याचे पोहेकों नीलकमल भोसले करीत आहेत. मागे पत्नी, दोन मुली व एक चिमुकला मुलगा आहे. नाजमीम यांच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.