काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र, राजीनामा की ‘नाराजी’नामा?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शामा तोटावार, प्रमोद लोणारे यांचा तडकाफडकी राजीनामा

बहुगुणी डेस्क, वणी: नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्ष शामा तोटावार व सेवादल शहर अध्यक्ष प्रमोद लोणारे यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे केवळ काँग्रेसमध्येच नाही तर शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाला वेळ देता येत नाही व कौटुंबिक जबाबदारी असे कारण राजीनाम्यात नमुद असले तरी तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे.

शामा तोटावार या गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. राजकीय वर्तुळात त्यांचे सन्मानपूर्वक कार्यकर्त्या म्हणून नाव घेतले जाते. त्यांच्याकडे काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी होती. तर प्रमोद लोणारे हे काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडे काँग्रेसच्या सेवादलाचे शहराध्यक्ष पद आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात व उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. शिवाय ते माजी नगरसेवक देखील आहेत. ते प्रभाग क्रमांक 6 ब मधून पक्षाकडून इच्छुक होते. मात्र त्यांची तिकीट कापल्या गेल्याने त्यांनी अपक्ष फॉर्म टाकला आहे. शामा तोटावार यांनी महिला जिल्हा अध्यक्ष वंदना आवारी यांच्याकडे तर प्रमोद लोणारे यांनी सेवादल जिल्हा अध्यक्ष राजू कासावार यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.  

काँग्रेसतर्फे अनेक इच्छुकांनी अर्ज केला होता. यात काही काँग्रेस समर्थक उमेदवारांचा समावेश होता. तर काही काँग्रेसचे कार्यकर्ते होते. मात्र तिकीट वाटपाच्या वाटाघाटीत त्यांचे तिकीट कापले गेले. प्रमोद लोणारे हे काँग्रेसचे निष्ठावंत व पालिकेचा अनुभव असलेले उमेदवार होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भाजपतर्फे तिकीट कापल्या गेलेले किंवा भाजपतर्फे तिकीट न मिळालेले एकही उमेदवार काँग्रेसकडे गेले नाही. त्यांनी शिंदे सेनेची वाट धरली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये काँग्रेसचे प्रमोद लोणारे यांनी अपक्ष फॉर्म टाकत बंडखोरी केली केली आहे. तर प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये धीरज भोयर यांचे नाव काँग्रेसतर्फे पुढे आले आहे. प्रभाग 4 ब मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. अद्याप फॉर्म परत घेण्यास आणखी दोन दिवस शिल्लक आहे. निवडणुकीच्या काळात तिकीट वाटपात नाराजी ही सर्वसामान्य बाब आहे. सध्या काँग्रेसमध्ये एकाच दिवशी दोन पदाधिका-यांचा राजीनामा आला आहे. ही नाराजी काँग्रेस कशी दूर करतो शिवाय प्रभाग 4 व 6 मधील विषय काँग्रेस कसा सोडवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.