अपघात: भरधाव पल्सरची रस्ता क्रॉस करणा-या महिलेला धडक

महिलेचा जागीच मृत्यू, नायगाव बस स्टॉपजवळील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील नायगाव (खु) गावाजवळ रोड क्रॉस करताना भरधाव बाइकची धडक बसल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयविदारक घटना शुक्रवारी दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव मंगला अशोक मिलमिले (वय अंदाजे 55, रा. नवीन वागदरा, ता. वणी) असे आहे. अपघातानंतर बाईक चालक पसार झाला. या प्रकरणी मृतकाच्या जावयाकडून वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक मंगला मिलमिले या नवीन वागदरा येथील रहिवासी होत्या. त्या रविवारी वणीहून ऑटोने नायगावला मुलगी व जावयाकडे जात होत्या. नायगाव बस स्टॉपजवळ ऑटो थांबला. मंगला ऑटोतून बाहेर आल्या व रोड क्रॉस करीत होत्या. दरम्यान वरोरा कडून वणीच्या दिशेने एक भरधाव लाल रंगाची पल्सर (MH-29 CK 1372) येत होती. या बाईकने मंगला यांना जोरदार धडक दिली.

अपघातात मंगला यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी बाइकचालक पळून गेला. घटनास्थळी लोक गोळा झाले. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणी मंगला यांचे जावई तुळशीराम पुंडलिक तुराणकर (वय 41, व्यवसाय शेती, रा. नायगाव) यांनी वणी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी बाईक चालकावर बीएनएसच्या कलम 281,106 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताने नायगाव परिसरात शोककळा पसरली असून, भरधाव वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी वाहनचालकांना वेग मर्यादा पाळण्याचे व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed.