टापूने घेतली संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट, विविध चर्चांना उधाण

भाजपला पालिकेत स्पष्ट बहुमत, टापूची भेट केवळ अभिनंदनासाठी – बोदकुरवार

विवेक तोटेवार, वणी: प्रभाग क्रमांक 9 ब चे नवनिर्वाचित नगरसेवक अब्दुल हाफिज उर्फ टापू यांनी माजी आमदार व भाजपचे वणी विधानसभा क्षेत्राचे नेते संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या घरी सहकार्यांसह भेट दिली. काही वेळातच या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर टापू यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे वृत्त शहरात पसरले आणि यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही भाजप समर्थकांनी याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. अखेर संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देत ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले.

प्रभाग क्रमांक 9 मध्ये अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज उर्फ टापू यांनी सव्वा दोनशेहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरीकडे भाजपने नगराध्यक्ष पदासह नगरपालिकेतील 29 पैकी 18 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास नगरसेवक टापू यांनी बोदकुरवार यांची घरी भेट घेतली. त्यानंतर टापू यांनी भाजपला पाठिंबा दिल्याची तसेच आगामी काळात त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा रंगू लागली. याचे काहींनी स्वागत केले तर काही भाजप समर्थकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. अखेर बोदकुरवार यांनी भूमिका स्पष्ट केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

टापूची केवळ सदिच्छा भेट – संजीवरेड्डी बोदकुरवार
बुधवारी रात्री नगरसेवक टापू यांनी सहका-यांसह भेट घेतली होती. मात्र ही भेट केवळ सदिच्छा भेट होती. त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी नगरपालिकेत मिळालेल्या विजयाबाबत अभिनंदन केले. यासह त्यांनी पालिकेत सहकार्य करणार असे सांगितले. भाजपला नगरपालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सध्या तरी कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही आणि आम्ही कुणालाही पाठिंबा मागितलेला नाही. आम्ही सर्व पक्षांना व नगरसेवकांना सोबत आणि विश्वासात घेऊनच शहराच्या विकासासाठी काम करणार आहोत. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या चर्चा निरर्थक आहेत, असे बोदकुरवार यांनी स्पष्ट केले.

लवकरच नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचा पदभार स्वीकारला जाणार असून त्यानंतर उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. नगरपालिकेत 3 सदस्यांची वर्णी स्वीकृत नगरसेवक म्हणून लागणार आहे. या निवडीसाठी अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवरच टापू यांच्या भेटीला शहरात विशेष महत्त्व दिले जात आहे.

Comments are closed.