वणीतील 7 घरफोड्यांचा छडा, 2 अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

घरफोडीच्या साखळीचा भांडाफोड, आंतरजिल्हा चोरट्यांचे रॅकेट उघड

विवेक तोटेवार, वणी: रात्रीच्या अंधारात घरफोडीच्या उद्देशाने फिरताना अट्टल चोरट्यांचा डाव अखेर फसला. वणी शहराला घरफोडीच्या साखळीने विळखा घातलेला असतानाच पोलिसांनी धाडसी कारवाई करत आंतरजिल्हा चोरट्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला ! वणी पोलिसांनी लालगुडा परिसरातून दोन कुख्यात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईत 2 लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत झाला असून वणीतील 7 तर भद्रावतीतील 1 घरफोडी उघडकीस आली आहे.

प्राप्त माहिती नुसार, बुधवारी दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री वणी पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करित होते. दरम्यान लालगुडा परिसरात दोघे जण संशयास्पद रित्या फिरताना आढळले. पथकाने दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र अखेर सदर तरुण हे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील अट्टल चोर असल्याचे समोर आले. त्यांनी 8 घरफोडीची कबुली दिली. सचिन संतोष नगराळे रा. बोरगाव (अहेरी) ता. वणी (हल्ली मुक्काम न्यू सोमठाणा ता. भद्रावती) व कार्तिक शंकर साळवे रा. घुटकाळा वार्ड नेहरू शाळे जवळ चंद्रपूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

सदर चोरटे हे घरफोडीचे आंतरजिल्हा रॅकेट चालवाचे. चंद्रपूर जिल्ह्यातून वणी येथे येऊन घरफोडी करायचे. तसेच त्यांनी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातही घरफोडी केल्या आहेत. 8 घरफोडी पैकी 7 घरफोड्या या वणी येथील व एक घरफोडी ही भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येथील आहे. चोरट्यांकडून चांदीचे साहित्य, होम थिएटर, माईक, टीव्ही व रोख रक्कम असा सुमारे 2 लाख 3 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींवर चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, घुग्घुस, गडचांदूर तसेच यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद आहे. दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी वणी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, पो.उ.नि. धनराज हाके तसेच पोलीस कर्मचारी सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सलमान शेख, रजनिकांत मडावी, सतीश फुके यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Comments are closed.