पुरुषोत्तम नवघरे, वणी: पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत वणी शहरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण, कौशल्यविकास व सक्षमीकरण या उद्देशाने दोन दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा 3 व 4 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकरी भवन, वणी येथे पोलीस स्टेशन वणीच्या वतीने यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमात लोकमान्य टिळक महाविद्यालय, जनता विद्यालय, विवेकानंद विद्यालय, स्वर्णलिला इंग्लिश मिडीयम स्कूल, मायक्रोन इंग्लिश मिडीयम स्कूल, डायमंड इंटरनॅशनल स्कूल तसेच आदिवासी मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थिनींसह एकूण सुमारे 650 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. कराटे प्रशिक्षक आनंद भुसारी यांनी आत्मसंरक्षणाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. वाहतूक नियमन व सुरक्षेवर पोलीस निरीक्षक देवकते (जिल्हा वाहतूक शाखा, यवतमाळ) व विजय महाले (वाहतूक शाखा, वणी) यांनी मार्गदर्शन केले. सायबर सुरक्षेवरील विशेष सत्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश तायडे यांनी डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन फसवणूक तसेच सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराविषयी माहिती दिली.
ड्रग व नशेविरोधी जनजागृती, नागरी शिस्त व महिला विषयक कायद्यांवर पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर व सपोनि शुभांगी गुल्हाणे यांनी वास्तव घटनांच्या उदाहरणातून विद्यार्थिनींना जागरूक केले. आरोग्य व प्राथमिक उपचारांवर डॉ. आवारी (वणी ग्रामीण रुग्णालय) यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सैद्धांतिक व प्रायोगिक सत्रांसह प्रश्नोत्तरांचा समावेश करण्यात आला. आत्मसंरक्षणाचे व्यवहारिक सराव घेण्यात आले. उपस्थितांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या.
पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवण्यात आला. संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपोनि प्रियंका चौधरी, निलेश अपसुंदे, सुदाम आसोरे, अंकुश वडतकर, महानवर, शेखर वांढरे तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. अभिजीत अणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पोउपनि सुदाम आसोरे यांनी मानले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षणाबाबत जागरूकता वाढली असून सायबर सुरक्षा, वाहतूक नियम व आरोग्यविषयक ज्ञान प्रभावीपणे मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थी व नागरिकांचे सक्षमीकरण करण्यावर पोलीस विभागाचा भर राहणार आहे.





Comments are closed.