मंगळवारपासून एपीएमसी मैदानावर क्रिकेटचा महासंग्राम

वणी ऍग्रो प्रिमियर लीगचे (सिजन 3) उद्घाटन, 5 दिवस रंगणार थरार

विवेक तोटेवार, वणी: बॅटचा कडकडाट, चेंडूचा वेग, प्रेक्षकांचा जल्लोष आणि जिंकण्यासाठी झुंजणारे संघ — या साऱ्यांनी सजलेली वणी ऍग्रो प्रीमियर लीग (सिझन 3) मंगळवारपासून एपीएमसी मार्केट मैदानावर रंगणार आहे. शहरातील कृषी व्यावसायिक, कर्मचारी आणि खेळाडूंचा उत्साह यंदा नव्या उंचीवर पोहोचला असून, पाच दिवस चालणाऱ्या या क्रिकेट महाकुंभात प्रत्येक सामना उत्कंठावर्धक ठरणार आहे. वणी ऍग्रो डीलर ऍन्ड एम्पलॉई असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तब्बल 10 संघांचा सहभाग असून, पाच दिवसांचा क्रिकेट महोत्सव स्थानिक चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी 41 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 31 हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 21 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. याशिवाय मॅन ऑफ द सिरिज, मॅन ऑफ द मॅच आणि टॉस विनिंग पुरस्कारही खेळाडूंना मिळणार आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत तर वणी एपीएमसीचे अध्यक्ष विनायकराव एकरे राहणार आहेत. 10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान सामने रंगणार असून, स्थानिक खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मैदानावर क्रिकेटचा उत्साह, प्रेक्षकांचा जल्लोष आणि स्पर्धेतील रोमांचक क्षण वणीकरांना अनुभवायला मिळणार आहेत.

वणी ऍग्रो प्रीमियर लीग केवळ एक स्पर्धा नसून ती वणीच्या क्रीडासंस्कृतीचा उत्सव ठरणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी व क्रीडारसिकांनी एपीएमसी मार्केट मैदानावर आवर्जून उपस्थित राहून या थरारक सामन्यांचा आनंद घ्यावा आणि खेळाडूंना उत्साहाने दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.