चक्क पोलवरची 12 किलोमीटरची ऍल्युमिनियम तार लंपास

18 क्विंटल वजनाच्या तार कापून नेली, सव्वा 2 लाखांचे नुकसान

बहुगुणी डेस्क, वणी: चोरट्यांनी चक्क पोलवरचा एक किमोमीटरचा नाही तर तब्बल 12 किलोमीटरचा तार चोरून नेला. वेगाव जवळ ही घटना घडली आहे. चोरट्यांनी अंदाजे 18 क्विंटल वजनाची तार चोरट्यांनी कापून नेली असून कंपनीचे सुमारे 2,25,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी संतोष रामगोपाल शर्मा (वय 38), मूळ मध्यप्रदेश येथील असून सध्या मारेगाव येथे वास्तव्यास आहेत. ते गेल्या सहा महिन्यांपासून पॉलीकॅब इंडिया कंपनीत इलेक्ट्रिक वर्कचे काम करत आहेत. सदर कंपनीकडून MSEB साठी वेगाव परिसरात काम सुरू आहे. 26 मार्च रोजी संतोष शर्मा यांनी काम आटोपून परत जाताना सर्व तार सुरक्षित असल्याची खात्री केली होती. मात्र 27 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजता सहकाऱ्याने फोन करून पोलवरील तार चोरी झाल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता पोलवरून संपूर्ण अॅल्युमिनियम तार कापून नेल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर संतोष व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र चोरीबाबत कोणताही ठोस धागादोरा लागला नाही. अखेर संतोष शर्मा यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरातील वीज प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments are closed.