बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी जोरदार धाडसत्र राबवत मोठी कारवाई केली आहे. सिंधी कॉलनी, एकता नगर, भाजी मंडी, दीपक चौपाटी, लालगुडा परिसरासह विविध ठिकाणी लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी जुगार कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. एकूण 53 प्रकरणे नोंदवून 3,51,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 01/01/2026 पासून गुरुवार पर्यंत ही धाड टाकण्यात आली.
माहिती द्या धाड टाकू – ठाणेदार
शहरात तसेच वणी पोलीस स्टेशन हद्दीत कुठेही अवैध जुगार सुरू असल्याची माहिती असल्यास ती आम्हाला कळवा. आम्ही तत्काळ धाड टाकून कठोर कारवाई करू. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. नागरिकांनी धाडस दाखवून अशा बेकायदेशीर व्यवसायाविरुद्ध आवाज उठवावा. तुमच्या सहकार्यामुळेच आम्ही अवैध जुगाराचे जाळे समूळ नष्ट करू शकतो. – ठाणेदार, वणी पोलीस स्टेशन
मटका अड्ड्यांवर पोलिसांनी सुरू केलेल्या धाडसत्राचे नागरिकांकडून स्वागत होत असले, तरी शहरात इतरही काही अवैध धंदे फोफावत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अशा सर्व बेकायदेशीर प्रकारांवरही पोलिसांनी तितक्याच कठोरतेने कारवाई करावी, अशी अपेक्षा वणीकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे. व्यापक आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळेच शहरातील अवैध व्यवसायांना पूर्णपणे आळा बसेल, असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनीअवैध जुगार व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली असून विशेष पथकांच्या माध्यमातून सातत्याने माहिती संकलन करून छापे टाकले जात आहेत. या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार व्यवसायाला मोठा आळा बसत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.



Comments are closed.