जि.प. नोकरीच्या नावाखाली 7.50 लाखांचा गंडा

नोकरीचे आमिष दाखवणा-या 2 भामट्यांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: जिल्हा परिषद चंद्रपूर येथे आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त शिक्षकाची 7 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तक्रारीनुसार, सुरेंद्र बोबडे हे महादेव नगरी चिखलगाव येथील रहिवासी असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांची आरोपी सुरेंद्र आस्कर (वय 62, रा. घोन्सा, चिखलगाव) सचिन गारघाटे (वय 51, रा. चंद्रपूर) यांनी बोबडे यांच्या मुलाला आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. 28/8/2024 रोजी सकाळी 11/00 वाजताच्या सुमारास बोबडे यांची बोबडे येथे राहत असलेल्या परिसरात भेट घेतली. त्यावेळी बोबडे यांनी आरोपींना  7 लाख रुपये चेकद्वारे आणि 50 हजार रुपये रोख स्वरूपात दिले.

दरम्यान, परीक्षा झाली. त्यानंतर मुलाला नोकरी काही लागली नाही. त्यामुळे बोबडे बाबत आरोपींशी विचारणा केली असता आरोपी याबाबत उत्तर देत होते. नंतर त्यांनी मोबाईल बंद ठेवणे सुरु केले. पैशाची वारंवार मागणी केल्यानंतर आरोपी पैसे परत देण्यास तयार झाले. आरोपींनी बोबडे यांना चेक दिला. मात्र दिलेला चेक बाऊन्स झाला. त्यामुळे फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच बोबडे यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध राहावे. कोणतीही संशयास्पद मागणी झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे. 

Comments are closed.