वणीत 2 एमडी ड्रग्ज तस्कर अटकेत – सव्वा 2 लाखाचा माल जप्त

देशमुख वाडी परिसरात रचला सापळा, एलसीबीची कारवाई

बहुगुणी डेस्क, वणी:  वणी शहरात स्थानिक गुन्हे शाखेने रचलेल्या सापळ्यात ‘एमडी’ (मेफेड्रोन) या सिंथेटिक ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघा तस्करांना रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईत 21 ग्रॅम 18 मिलीग्रॅम एमडी ड्रग्जसह एकूण 2,30,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला वणी परिसरात एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 18 एप्रिल रोजी सायंकाळी देशमुख वाडी परिसरातील बसस्थानकाच्या मागील रस्त्यावर पथकाने सापळा रचला. काही वेळातच संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एमडी ड्रग्ज आढळून आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल दिलीप ठाकुरवार (वय 40, रा. देशमुख वाडी, वणी) व प्रितम लिलाराम केशवाणी (वय 44, रा. गुरुनानक नगर, वणी) अशी आहेत. पंचासमक्ष तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून 21 ग्रॅम 18 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज (अंदाजे किंमत 1,27,080 रुपये), रोख रक्कम, मोबाईल फोन आणि विनाक्रमांक मोपेड असा एकूण 2,30,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

पथकात पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके तसेच पोलीस अंमलदार सुधिर खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदूरकर, निलेश निमकर, पोकॉ. सलमान शेख, रजनीकांत मडावी व चापोना सतीश फुके यांचा समावेश होता.

Comments are closed.