विवेक तोटेवार, वणी: शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर वणी पोलिसांनी धडक कारवाया सुरू ठेवल्या असून 13 एप्रिल ते 18 एप्रिल 2026 या कालावधीत विविध ठिकाणी छापे टाकून जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. या दरम्यान एकूण 5 प्रकरणे नोंदवून 31,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाकडून भाजी मंडई, खादी चौक, ज्योती बार समोरील रस्ता, लालगुडा परिसर आदी ठिकाणी लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
दरम्यान, 16 एप्रिल रोजी सायंकाळी भाजी मंडई परिसरात ‘वरली मटका’ जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अड्डा उधळून लावला. या प्रकरणी पोलीस फिर्यादी मिथुन तुळशिराम राऊत (वय 37) यांच्या तक्रारीवरून अशपाक खान अब्बास खान (वय 36, रा. मोमीनपुरा), रवि राजेश घुगरे (वय 32, रा. रामपुरा वॉर्ड) व शेख मुस्ताक शेख असम (वय अंदाजे 43, रा. ढोर दवाखान्याच्या मागे, वणी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) तसेच बी.एन.एस. कलम 49 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून 3,000 रुपये रोख, ‘वरली मटका’च्या चिठ्या, कार्बन तुकडा व बॉलपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत हा मटका व्यवसाय शेख मुस्ताक शेख याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलीस विभागाकडून सातत्याने माहिती संकलन करून विशेष पथकांच्या माध्यमातून अशा जुगार अड्ड्यांवर कारवाया सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलीसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.



Comments are closed.