बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील निवली शिवार परिसरात महावितरणच्या 11 केव्ही लाईनवरील लोखंडी खांब चोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही घटना 17 एप्रिल रोजी रात्री 8:30 ते 9:00 वाजताच्या दरम्यान घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव बंडुजी सिसाम (वय 35, व्यवसाय – लाईनमन, वणी) यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, निवली ते तरोडा रोडलगत असलेल्या महावितरणच्या 11 केव्ही सुंदरनगर लाईनचे लोखंडी खांब काही अज्ञात चोरट्यांकडून जमिनीतून उपसून चोरी करण्याचा प्रयत्न सुरू होता. ही माहिती मिळताच ते सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असता, चोरटे खांब उपसण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले.
फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना पाहताच आरोपींपैकी काही जण पळून गेले, तर एक पुरुष व एक महिला यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य व एक दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले.
या प्रकरणी एका महिलेसह वणीतील दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) व 62 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस शिपाई सुनील दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Comments are closed.