हार्मोज इफेक्ट – पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

ट्रॅक्टरची टाकी फुल न केल्यातून वाद... चौघांची मारहाण

बहुगुणी डेस्क,वणी: मारेगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. “ट्रॅक्टरची टाकी फुल्ल करा” अशी मागणी ट्रॅक्टर चालकाने केली. मात्र टाकी फुल करता येणार नाही. असे सांगितल्यावर त्यातून वाद झाला. दरम्यान चौघांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Birthday

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर गोकुळ राऊत (वय 25, रा. गौराळा, ता. मारेगाव) हे गुरु आनंद सर्व्हिस सेंटर, मारेगाव पेट्रोल पंपावर कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 22 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास आरोपी आदित्य वसंता बुच्चे (रा. साखरा) हा आपल्या साथीदारांसह ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यावेळी पंपावर डिझेल कमी असल्याने कर्मचाऱ्याने पूर्ण टाकी भरता येणार नसल्याचे सांगितले. मात्र आरोपीने आग्रह केल्यानंतर कर्मचाऱ्याने सुमारे ₹3,000 चे डिझेल ट्रॅक्टरमध्ये टाकले. त्यानंतर आरोपीने “फुल डिझेल भरले नाही तर पैसे देणार नाही,” अशी भूमिका घेतली. यावर कर्मचाऱ्याने पैसे दिल्याशिवाय ट्रॅक्टर जाऊ देणार नसल्याचे सांगितले.

याच कारणावरून आरोपी आदित्य बुच्चे, साहिल परचाके, यश बुच्चे आणि सागर बिलबिले यांनी एकत्र येत कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणी दरम्यान चौघांपैकी एकाने हातातील लोखंडी गोट्याने चंद्रशेखर राऊत यांच्या डोक्यावर वार केला. तसेच त्यांना खाली पाडून मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या पायाला व शरीरावर दुखापत झाली.

घटनेनंतर जखमी कर्मचाऱ्याने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments are closed.