राजूर कॉलरीतील साईनगर-बिरसामुंडा नगर अंधारात;
उकाड्याने हाल, डीपी बिघाडाने 13 तासांपासून वीजपुरवठा ठप्प
बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरी येथील साईनगर व बिरसामुंडा नगर परिसरातील डीपी (विद्युत वितरण ट्रान्सफॉर्मर) मध्ये बिघाड झाल्याने गेल्या सुमारे १३ तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. विशेष म्हणजे बिघाड झाल्यानंतरही दुरुस्तीच्या कामास सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २ जून) सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या दरम्यान संबंधित डीपीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे काही फेजवर अतिजास्त विद्युत दाब तर काही फेजवर अत्यंत कमी दाबाची समस्या निर्माण झाली. बिघाडाचे नेमके कारण शोधण्यात रात्री उशिरापर्यंत वेळ गेला. अखेर ट्रान्सफॉर्मरमध्ये दोष असल्याचे स्पष्ट झाले. मात्र रात्रीच्या वेळी काम करणे शक्य नसल्याचे सांगत कर्मचारी परतल्याने परिसरातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात आणि उकाड्यात काढावी लागली.
सध्या परिसरात तीव्र उष्णतेची लाट असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. रात्रभर अनेकांना झोप लागली नाही. तसेच व्यावसायिकांचेही आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ज्या फेजवर विद्युत दाब अधिक होता, त्या भागातील नागरिकांनी घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून वीजपुरवठा बंद ठेवला.
दरम्यान, राजूर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, दिवसभर विजेचा लपंडाव सुरू राहणे, ३३ केव्ही लाईनमधील बिघाड, लोंबकळणाऱ्या तारांमुळे होणारे स्पार्किंग आणि सतत सुरू असलेली दुरुस्तीची कामे यामुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. वीज विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपाची कामे करून वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अनेक नागरिकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास गैरसोय टाळण्यासाठी इन्व्हर्टर बसविले आहेत. मात्र विद्युत दाबातील सातत्याने होणाऱ्या चढ-उतारांमुळे इन्व्हर्टरही प्रभावीपणे काम करत नसल्याचे सांगितले जात आहे. काहींनी सौरऊर्जा प्रकल्प उभारले असले तरी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्यांचाही अपेक्षित लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे.
गेल्या अनेक तासांपासून वीजपुरवठा विस्कळीत असतानाही दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. (सकाळी वृत्त लिहीपर्यंत लाईट आलेली नाही)



Comments are closed.