30 झाडांच्या तोडीला वृक्ष संवर्धन समितीचा तीव्र विरोध

जुने वृक्ष म्हणजे शहराचे फुफ्फुस’; पर्यावरण संतुलन राखण्याची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील सावित्रीबाई फुले चौक परिसरात प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी सुमारे 30 झाडांची तोड करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन समिती, वणी यांनी वणी नगर परिषदेला तीव्र हरकत नोंदवली आहे. तसेच झाडतोड थांबवून पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन आक्षेप नोंदवत वृक्षतोड न करता पर्यायी जागा शोधावी, अशी मागणी केली आहे.

नगर परिषदेच्या मालकीच्या अस्तित्वातील जलशुद्धीकरण केंद्राच्या मोकळ्या जागेत 22.00 द.ल.ली. क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. मात्र या कामामुळे परिसरातील कडुलिंब (6), आवळा (3), आंबा (6), वड (1), जांबूळ (2), करंजी (1), अशोका (8), औदुंबर/गुलर (1), रामफळ (1) व आपटा/सोना (1) अशी एकूण सुमारे 30 झाडे बाधित होणार आहे.

ही झाडे शहराच्या पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची असून, ती अनेक वर्षांपासून वाढलेली आहेत. सध्याच्या परिस्थितीत वणी शहर प्रदूषण, वाढते तापमान आणि हवामान बदलाच्या समस्यांना सामोरे जात असल्याने ही झाडे “नैसर्गिक फुफ्फुस” म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची तोड झाल्यास पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

समितीने प्रशासनाला स्पष्ट मागणी केली आहे की, प्रस्तावित 30 झाडांची तोड तात्काळ थांबवावी, तसेच पर्यायी जागा किंवा झाडांना बाधा न होणारी सुधारित रचना स्वीकारावी. विकासकामे आवश्यक असली तरी ती पर्यावरणाचे संरक्षण राखूनच व्हावीत, अशी भूमिका समितीने मांडली आहे. जर झाडतोडीचा निर्णय कायम ठेवण्यात आला, तर वृक्षसंवर्धन समिती व नागरिकांच्या वतीने शांततामय लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

झाडे वाचविणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे रक्षण –डॉ. महेंद्र लोढा
विकासकामे नक्कीच आवश्यक आहेत, परंतु ती करताना पर्यावरणाचा समतोल राखणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. शहरातील जुनी व मोठी झाडे ही केवळ निसर्गसंपदा नसून आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठीची अमूल्य ठेव आहे. त्यामुळे कोणतीही वृक्षतोड ही शेवटचा पर्याय म्हणूनच विचारात घेतली पाहिजे. – डॉ. महेंद्र लोढा, उपाध्यक्ष वृक्ष संवर्धन समिती, वणी

निवेदन देते वेळी राजाभाऊ बिलोरिया, डॉ. महेंद्र लोढा, दीपक छाजेड, रवि मत्ते, निलाम काळे, नितीन शिरभाते, दीपक कोकास यांच्यासह वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य व शहरातील मान्यवर उपस्थित होते. वृक्षसंवर्धन समितीने यापूर्वीही शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य केले आहे.

Comments are closed.