कत्तलीसाठी नेली जात होती दोन गोवंश जनावरे

गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला; तिघांवर गुन्हा

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील मोहोर्ली येथे कत्तलीसाठी अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असलेल्या दोन गोवंश जनावरांची पोलिसांनी सुटका केली असून बोलेरो पिकअप वाहनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 8 जून 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजताच्या दरम्यान मोहोर्ली परिसरात बोलेरो पिकअप (क्र. TG01 C1290) मधून दोन गोवंश जनावरांची संशयास्पदरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत वाहनाची तपासणी केली असता जनावरांना अत्यंत क्रूरपणे वाहनात कोंबून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तपासादरम्यान जनावरांचे चारही पाय आखूड दोऱ्यांनी बांधलेले होते. त्यांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच जनावरांची वाहतूक ही कत्तलीच्या उद्देशाने केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकरणी फिर्यादी पुणाजी गुलाब मेश्राम (वय 26, रा. मोहोर्ली) यांच्या तक्रारीवरून मोहम्मद जलाल मोहम्मद वखारउद्दीन (वय 21), कैलास दत्तू कांबळे (वय 22, दोघेही रा. यापलगोडा, ता. आदिलाबाद) तसेच नवनाथ गोरखनाथ जाधव (वय 26, रा. मोहोर्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे ₹15 हजार किंमतीची दोन गोवंश जनावरे तसेच अंदाजे ₹2.50 लाख किंमतीचे बोलेरो पिकअप वाहन जप्त केले. एकूण सुमारे ₹2.65 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नीलकमल भोसले करीत असून, गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Comments are closed.