विवेक तोटेवार, वणी: नागपूरहून येणाऱ्या एमडी ड्रग्जच्या खेपा, वणीत तयार झालेले विक्रीचे जाळे आणि त्यामागे काम करणारी स्थानिक टोळी… या संपूर्ण साखळीवर वणी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा घाव घातला आहे. ‘काँकरोच’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली असून या रॅकेटमध्ये एका वेकोली कर्मचाऱ्याचे नाव समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. शहरात गुपचूप पसरत असलेल्या ड्रग्जच्या जाळ्याचा हा फक्त एक भाग असून तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे वणी पोलिसांनी 19 जून रोजी रात्री सुमारे 9.45 वाजता गणेशपूर रोड परिसरात छापा टाकला. यावेळी कौतुक उर्फ गोलू दिलीप मेश्रराम (वय 28, रा. तेलीफैल, वणी) याच्या अंगझडतीदरम्यान प्लास्टिकच्या पाऊचमध्ये 19.27 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत 1 लाख 34 हजार 890 रुपये असून त्याच्याकडील 15 हजार रुपयांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
चौकशीदरम्यान आरोपीने हा एमडी पावडर प्रज्ज्वल उर्फ कॉकरोच महेश उपरे (वय 27, रा. तेलीफैल, वणी, सध्या रा. नागपूर) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. या लिंकवरून पोलिसांनी प्रज्ज्वल महेश उपरे, अविनाश विजय पाटील (वय 42, रा. छोरिया ले-आऊट, वणी) आणि रविंद्र धनराज गुप्ता (वय 34, रा. रंगनाथ नगर, वणी) या तीन आरोपींना अटक केली.

वणी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, एमडी तसेच इतर अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास ती पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रोहित बसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.


Comments are closed.