विवेक तोटेवार वणी: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ईद मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वावर जिशान डेव्हलपर्सचे संचालक इकबालभाई यांनी पंचशील नगर परिसरात भव्य लंगरचे आयोजन केले. या उपक्रमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला.
ईद मिलादुन्नबी हा इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असून मुस्लिम बांधव हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, आपसी बंधुभाव, प्रेम आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने लंगरचे आयोजन करण्यात आले. पंचशील नगर परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. संपूर्ण खर्च इकबालभाई यांनी स्वतःच्या खिशातून केला असून, याकरिता कोणतीही वर्गणी घेत नसल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला सय्यद माशूक अली वारसी साहेब, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे नेते संजय खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सय्यद सरफराज भाई, शाहीद खान, जावेद शेख, हनीफ भाई, इमरान खान, आसिम हुसैन, शारीक शेख, नौसीफ खान, शाकीर खान यांच्यासह मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे इकबाल हुसैन शेख यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने आयोजित या लंगरमधून प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचला.


Comments are closed.